परेलचा राजा: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, जाणून घ्या नरेपार्कच्या बाप्पाचा इतिहास
परेल विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळखला जाणारा परेलचा राजा हा मुंबईतील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित गणेश मंडळांपैकी एक आहे.
मुंबईतील परळ भागातील नरे पार्क मैदानावर उभा राहणारा गणपती परेलचा राजा म्हणून ओळखला जातो. परेल विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या नावानेही हे मंडळ प्रसिद्ध आहे आणि शहरातील सर्वात जुन्या व प्रतिष्ठित गणेश मंडळांमध्ये त्याची गणना होते. हे मंडळ दरवर्षी नरे पार्क मैदानावर बाप्पाची एक भव्य मूर्ती स्थापित करते.
या मंडळाची मुळं भारताच्या स्वातंत्र्याच्या वर्षाशी, म्हणजे १९४७ सालाशी जोडलेली आहेत. त्याच वर्षी परेल विभागातील काही स्थानिक गणेश भक्त आणि कार्यकर्ते एकत्र आले आणि नरे पार्क मैदानावर या उत्सवाची सुरुवात झाली. सुरुवातीला हा एक लहान प्रयत्न होता, पण नरेपार्क मैदानावर सगळे गणेश कार्यकर्ता एकत्र येत गेले आणि या मंडळाचा हळूहळू एका मोठ्या वटवृक्षासारखा विस्तार झाला.
हळूहळू या छोट्या प्रयत्नाचे एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आणि आज हा गणपती मुंबईतील सर्वात प्रमुख आकर्षणांपैकी एक बनला आहे. या गणपतीला आता परेलचा राजा म्हणून ओळख मिळाली आहे. २०२६ साली हे मंडळ आपल्या ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे, यावरूनच याच्या ऐतिहासिक महत्त्वाची कल्पना येते.
परेलच्या राजाची खासियत म्हणजे त्याची भव्य आणि विशाल मूर्ती. वर्षानुवर्षे येथे २३ फूट ते २८ फूट उंचीच्या आणि काही वेळा त्याहूनही उंच मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. दरवर्षी या बाप्पाची मूर्ती वेगळ्या रूपात सजते आणि यंदाही अत्यंत मनमोहक मूर्ती उभारण्यात आली आहे. या मूर्तीचे डोळे आणि डोक्यावरील टोपी सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरले आहेत, आणि परेलच्या राजाची ही मूर्ती यंदा सर्वत्र चर्चिली जात आहे.
केवळ भव्य उत्सव साजरा करणं हेच या मंडळाचं काम नाही. गेल्या अनेक दशकांपासून हे मंडळ सामाजिक आणि समाजकल्याणकारी उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत आलं आहे.
दरवर्षी बाप्पाचा दरबार सजवण्यासाठी देशातील प्रसिद्ध मंदिरे किंवा ऐतिहासिक स्मारकांवर आधारित भव्य आणि वेगळे मंडप व चित्ररथ तयार केले जातात. अनेकदा लोक परळ भागातील लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा-गणेश गल्ली या दोन्ही बाप्पांसोबत नरेपार्कच्या बाप्पाचा गोंधळ करतात. पण परेलचा राजा, म्हणजे नरेपार्कचा बाप्पा, याची स्वतःची अशी वेगळी आणि ऐतिहासिक ओळख आहे, जी या इतर मंडळांपेक्षा निराळी आहे.