गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:01 IST

सेवाग्रामच्या एमबीबीएस 2020 बॅचला पालकमंत्री डॉ.भोयर यांनी दिली सेवाभावाची शिकवण

वर्ध्याच्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये फाउंडेशन डे आणि ग्रॅज्युएशन सेरेमनीत नवोदित डॉक्टरांना पदवी वितरण, पालकमंत्र्यांनी कोरोना काळात शिक्षण घेतलेल्या बॅचचा केला गौरव.

सेवाग्रामच्या एमबीबीएस 2020 बॅचला पालकमंत्री डॉ.भोयर यांनी दिली सेवाभावाची शिकवण
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेने केवळ वर्धा जिल्ह्यापुरते काम न ठेवता दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचे मोठे काम केले आहे. याच संस्थेतील 2020 च्या एमबीबीएस बॅचमधील नवोदित डॉक्टरांनी संस्थेने दिलेले शिक्षण, संस्कार आणि सेवाभावाची परंपरा पुढे नेत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवावी, असे आवाहन राज्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

सेवाग्राम येथे झालेल्या फाउंडेशन डे आणि ग्रॅज्युएशन सेरेमनी - एमबीबीएस बॅच 2020 या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ.भोयर बोलत होते. या कार्यक्रमाला कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सचिव डॉ.बी.एस.गर्ग, डीन डॉ.ए.के.शुक्ला, डॉ.पुनम शिवकुमार, डॉ.सतीश कुमार हे उपस्थित होते. सोबतच अनेक डॉक्टर, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक व नातेवाईकही या कार्यक्रमाला हजर होते.

कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात वैद्यकीय शिक्षण सुरू केलेल्या या 2020 च्या बॅचने प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य, आत्मविश्वास आणि सेवाभाव जपला, याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे या बॅचला केवळ 'कोरोनाची बॅच' असे न म्हणता 'कोरोना योद्ध्यांची बॅच' म्हणून ओळखले जावे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. संस्थेने दिलेला साधेपणा, शालीनता, नैतिक मूल्ये आणि सेवाभाव या नवोदित डॉक्टरांनी जपत, हे संस्कार गरजू आणि वंचित घटकांच्या सेवेसाठी वापरावेत, असेही आवाहन त्यांनी केले.

नवोदित डॉक्टरांचे अभिनंदन करताना डॉ.भोयर यांनी एमजीआयएमएसशी असलेल्या आपल्या कौटुंबिक आठवणींनाही उजाळा दिला. सेवाभावी उद्देशाने 1969 साली सुरू झालेल्या या संस्थेने आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून आजही ही सेवापरंपरा अखंड सुरू आहे, असे ते म्हणाले. शहरांसोबतच ग्रामीण आणि दुर्गम भागातील सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवून देणे, हेच खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्थेचे यश असल्याचे त्यांनी नमूद केले. देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून एमबीबीएस आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या जागाही लक्षणीय वाढल्या आहेत, तसेच देशातील एम्सची संख्याही वाढल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत या योजनांमधून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर कॅशलेस आरोग्यसेवा मिळत असून कर्करोग तपासणी व उपचारासाठीही विशेष प्रयत्न केले जात असल्याचे डॉ.भोयर यांनी सांगितले.

डॉ.बी.एस.गर्ग यांनी विद्यार्थी आता संवेदनशील डॉक्टर म्हणून समाजात प्रवेश करत असल्याचे सांगत, रुग्णांशी सहानुभूतीने वागण्याची गरज व्यक्त केली. गरीब, महिला, मुले, वृद्ध, दिव्यांग आणि उपेक्षित घटकांवर उपचार करताना अनुकंपा, कौशल्य आणि माणुसकी जपावी, असे त्यांनी सांगितले. डीन डॉ.ए.के.शुक्ला यांनी येथील विद्यार्थी कुठेही कार्यरत राहिले तरी एमजीआयएमएसचे रुग्णदूत राहतील असे सांगत, संस्थेचे शिक्षण व संस्कार सदैव सोबत ठेवण्याचे आणि पालकांचा त्याग व शिक्षकांचे मार्गदर्शन लक्षात ठेवून गरजू रुग्णांच्या सेवेसाठी ज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ.कांचन यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा तर डॉ.पुनम शिवकुमार यांनी कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष पी. एल. तापडिया यांचा शुभेच्छा संदेश उपस्थितांना वाचून दाखवला. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना एमबीबीएस पदवीचे वितरण करण्यात आले आणि नवोदित डॉक्टरांना डॉक्टर प्रतिज्ञाही देण्यात आली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ