गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:40 IST

ओयो रूम बुकिंगसाठी कडक नियमावली, नागपूर पोलीस आयुक्तांच्या पावलाचे बावनकुळेंकडून कौतुक

नागपुरात ओयो हॉटेल बुकिंगवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नियमावलीचे कौतुक केले.

ओयो रूम बुकिंगसाठी कडक नियमावली, नागपूर पोलीस आयुक्तांच्या पावलाचे बावनकुळेंकडून कौतुक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राज्यात गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तारलेल्या ओयो या ऑनलाइन हॉटेल आणि रूम बुकिंग सेवेबाबत राज्य सरकार लवकरच नवी नियमावली आणण्याची शक्यता आहे. या दिशेने नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आधीच पावले उचलली आहेत. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दल माहिती दिली आणि आगामी काळात ओयो सेवेवर आणखी कठोर निर्बंध येण्याचे संकेत दिले.

बावनकुळे यांनी सांगितले की, ओयोसारख्या ठिकाणी लोक येतात-जातात, याबाबत त्यांची पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती आणि दोघांनीही हा विषय गांभीर्याने घेतला. त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांचे विशेष अभिनंदन केले, कारण त्यांनी यासाठी चांगली नियमावली तयार केली आहे. या नव्या नियमांनुसार, ओयो हॉटेलमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाचा रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक असेल. तसेच 90 दिवसांचे सीसीटीव्ही चित्रीकरण साठवून ठेवणे अनिवार्य केले जाणार आहे.

नागपुरात प्रत्येक दोन हॉटेलमागे एक ओयोचा बोर्ड लागलेला दिसतो, असे नमूद करत बावनकुळे यांनी हे बोर्ड नेमके कशासाठी लावले जातात, याची तपासणी करण्याची गरज व्यक्त केली. यापुढे शहरातील प्रत्येक ठिकाणी ओयोवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याची सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा बिघडू नये, यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी घेतलेल्या काळजीबद्दलही त्यांनी विशेष कौतुक केले. सध्या ही नियमावली नागपूरपुरती लागू असली तरी, ती राज्यभरातील ओयो रूम बुकिंग सेवेला लागू होणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

याच वेळी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेपेक्षा राज्यातील दुष्काळाची परिस्थिती हा मुद्दा अधिक महत्त्वाचा असल्याचे मत मांडले. मुंबईत आंदोलन करणे मुंबईकरांसाठी कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठीण ठरते, असे ते म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत दिलेले निर्णय लक्षात घेता, शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी राज्यातील सर्व आंदोलकांना केली. सध्याच्या काळात मुंबईत आंदोलन करणे राज्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी टीका महाराष्ट्राला आणि समाजाला रुचत नसल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ