गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:02 IST

NCMC कार्ड रिचार्ज करताना एजंट की कंडक्टर? चुकीची निवड केल्यास प्रवाशांचे पैसे कापले जाणार

एसटी महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड बंधनकारक केल्यानंतर रिचार्जच्या पद्धतीनुसार शुल्कात मोठा फरक असल्याचे समोर आले आहे.

NCMC कार्ड रिचार्ज करताना एजंट की कंडक्टर? चुकीची निवड केल्यास प्रवाशांचे पैसे कापले जाणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC ने 1 सप्टेंबर 2026 पासून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड सक्तीचे केले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील एसटी आगारांमध्ये कार्ड काढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक प्रवाशांच्या हातात कार्ड पोहोचले असले तरी काहीजण अजूनही कार्डची वाट पाहत आहेत.

कार्ड हातात आल्यानंतर ते रिचार्ज करताना मात्र प्रवाशांनी सावध राहायला हवे. कारण कुठून रिचार्ज केला जातो त्यानुसार कार्डवर प्रत्यक्ष जमा होणाऱ्या रकमेत मोठी तफावत येते. चुकीच्या माध्यमातून रिचार्ज केल्यास प्रवाशांचे पैसे विनाकारण कमी होण्याची शक्यता आहे.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे, अजून NCMC कार्ड हातात आले नसेल तरी अर्ज केल्यानंतर मिळालेली पावती दाखवून प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. त्यामुळे कार्ड न मिळाल्याने कोणालाही सवलतीच्या प्रवासापासून वंचित राहावे लागणार नाही.

सध्या NCMC कार्ड रिचार्ज करण्यासाठी प्रवाशांकडे तीन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला म्हणजे एसटी बसमधील वाहक किंवा आगारातील कर्मचाऱ्यांकडून रिचार्ज करणे, दुसरा म्हणजे एजंटमार्फत रिचार्ज करणे आणि तिसरा पर्याय म्हणजे ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या रिचार्ज करणे. यापैकी कंडक्टर आणि एजंटकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कात मोठी तफावत असल्याने प्रवाशांनी हा फरक समजून घेणे गरजेचे आहे.

उदाहरणादाखल पाहायचे झाल्यास, कंडक्टरकडे 50 रुपयांचा रिचार्ज केल्यास GST आणि इतर शुल्क वजा करून कार्डवर 49.47 रुपये जमा होतात. यात 0.08 रुपये GST आणि 0.45 रुपये शुल्क कापले जाते. मात्र हाच 50 रुपयांचा रिचार्ज एजंटकडून केल्यास कार्डवर फक्त 37.67 रुपयेच जमा होतात, कारण त्यातून 1.88 रुपये GST आणि 10.45 रुपये सुविधा शुल्क कापले जाते. याचा अर्थ कंडक्टरकडून रिचार्ज केल्यास 49.47 रुपये आणि एजंटकडून रिचार्ज केल्यास केवळ 37.67 रुपये मिळतात, म्हणजेच दोन्हीत तब्बल 11.80 रुपयांचा फरक पडतो.

एजंटकडून जास्त शुल्क का आकारले जाते, याचे कारण म्हणजे NCMC सेवा पुरवठादाराच्या निविदेत कार्ड व्यवहार हाताळणाऱ्या एजंटना MDR अर्थात Merchant Discount Rate देण्याची तरतूद आहे. डिजिटल कार्ड किंवा कार्ड पेमेंटच्या प्रक्रियेसाठी बँका, पेमेंट नेटवर्क किंवा सेवा पुरवठादारांकडून हे शुल्क घेतले जाते.

MSRTC अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रत्येक 100 रुपयांच्या रिचार्जवर एजंटकडून सुमारे 13.86 रुपयांची कपात होते. याउलट एसटीच्या कंडक्टरकडून टॉपअप केल्यास प्रवाशांकडून फक्त 2 रुपये गेटवे फी आकारली जाते. कंडक्टर हे MSRTC चे स्वतःचे कर्मचारी असल्याने त्यांना एजंटप्रमाणे कमिशन दिले जात नाही, हेच या फरकामागचे मुख्य कारण आहे.

त्यामुळे NCMC कार्डधारकांनी रिचार्ज करण्याआधी शुल्काची पुरेशी माहिती घेणे आवश्यक ठरते. एजंटकडून रिचार्ज केल्यास कार्डवर जमा होणारी रक्कम मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, हे लक्षात घेऊन शक्य तितक्या वेळा एसटी कंडक्टर किंवा अधिकृत ऑनलाइन माध्यमातूनच रिचार्ज करणे प्रवाशांच्या फायद्याचे ठरेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ