रामटेक, नागपूर आणि नाशिकमध्ये नवी फिल्म सिटी; मराठी सिनेमासाठीही वेगळी योजना
राज्य सरकारने मुंबईपाठोपाठ रामटेक, नागपूर आणि नाशिकमध्ये नव्या हाय-टेक फिल्म सिटी उभारण्याचा निर्णय घेतला असून, मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र फिल्म सिटी आणि जास्त थिएटरची योजनाही तयार होत आहे.
मुंबईतली फिल्म सिटी आतापर्यंत महाराष्ट्रातल्या चित्रपट निर्मितीचं मुख्य केंद्र राहिली आहे. पण आता बनणाऱ्या सिनेमांची संख्या इतकी वाढली आहे की एकट्या मुंबईतल्या फिल्म सिटीवर हे काम भागेनासं झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, मुंबईबरोबरच रामटेक, नागपूर आणि नाशिक इथेही नव्या फिल्म सिटी उभारल्या जाणार आहेत.
सरकारला फक्त साधी फिल्म सिटी नको आहे, तर पूर्णपणे आधुनिक आणि हाय-टेक अशी फिल्म सिटी बनवायची आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी सिनेमाचा दर्जा कायम ठेवत त्यात नवं तंत्रज्ञान जोडलं जाणार आहे. एखादा सिनेमा बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी - शूटिंगसाठीचे वेगवेगळे सेट, लाईट, कॅमेरा, एडिटिंग - एकाच ठिकाणी मिळतील, त्यामुळे दिग्दर्शकाला कामासाठी दुसरीकडे कुठे जावं लागणार नाही. रामटेक, नागपूर आणि नाशिक या तीनही ठिकाणी हीच योजना आहे.
मराठी सिनेमासाठीही एक आनंदाची बातमी आहे. 62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मराठी सिनेमांना जास्त थिएटर मिळावेत यासाठी सरकार एक विशेष योजना तयार करत असून, याची घोषणा लवकरच केली जाईल. फक्त थिएटरच नाही तर मराठी सिनेमांसाठी स्वतंत्र हाय-टेक फिल्म सिटी बनवण्याचाही विचार सुरु आहे. यात सगळ्या लेटेस्ट सुविधा असतील, ज्यामुळे मराठी दिग्दर्शकांना मोठ्या बजेटचे सिनेमेही इथेच बनवता येतील.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितलं की मुंबईत आधीच फिल्म सिटी आहे, कर्जतला एनडी स्टुडिओ आहे आणि कोल्हापूरलाही शूटिंगसाठीच्या सुविधा उपलब्ध आहेत. आता सरकार रामटेक आणि नाशिकमध्ये नव्या फिल्म सिटी उभारणार आहे.
रामटेकसाठी जमीनही निश्चित झाली आहे. इथल्या नवगाव या ठिकाणी 100 एकर जागेवर ही फिल्म सिटी उभी राहणार आहे. रामटेकचं लोकेशन निसर्गरम्य असल्यामुळे नवगाव इथे फिल्म सिटी बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय मुळात 2018 सालीच घेतला गेला होता, आणि तेव्हापासून त्यासाठी योग्य जागा शोधण्याचं काम सुरु होतं. आता भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, रामटेकमध्ये लवकरच प्रत्यक्ष काम सुरु होणार आहे.
याशिवाय कोल्हापूरमध्येही रेल्वे स्टेशनसह आणखी दोन-तीन नवी शूटिंग लोकेशन्स तयार केली जात आहेत. महाराष्ट्राने चित्रपटसृष्टीला नेहमीच मोठं योगदान दिलं आहे, आणि आता या नव्या फिल्म सिटींमुळे मराठीसह हिंदी आणि इतर भाषांमधल्या सिनेमांचं शूटिंग राज्यातच जास्त प्रमाणात होईल, तसंच स्थानिक तरुणांनाही यातून रोजगार मिळेल.