गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:04 IST

आरोग्य सेवांच्या डिजिटलायझेशनवर पालिकेचा भर, तक्रारी-नोंदींवर डॅशबोर्डद्वारे नजर

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील डॉक्टरांची उपस्थिती, नागरिकांच्या तक्रारी, जन्म-मृत्यू दाखले आणि खरेदी प्रक्रिया या सर्व बाबी आता डिजिटल पद्धतीने तपासल्या जाणार आहेत.

आरोग्य सेवांच्या डिजिटलायझेशनवर पालिकेचा भर, तक्रारी-नोंदींवर डॅशबोर्डद्वारे नजर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत डॉक्टर वेळेवर हजर असतात का, एखाद्या नागरिकाची तक्रार किती दिवस पेंडिंग आहे, जन्म-मृत्यू दाखल्याचा अर्ज नेमका कुठे अडकला आहे किंवा औषधे व उपकरणांची खरेदी कोणत्या टप्प्यावर रखडली आहे, या सगळ्या गोष्टींवर आता अधिक प्रभावीपणे आणि डिजिटल पद्धतीने लक्ष ठेवण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

आरोग्य सेवा फक्त रुग्णालयापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक टप्प्यावर जबाबदारी निश्चित करणारी आणि नागरिक व रुग्णाभिमुख यंत्रणा उभी करण्यावर भर दिला जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी सायन येथील लो. टिळक सार्वजनिक रुग्णालयात सांगितले.

पालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील जुने आणि बरेच दिवस रखडलेले प्रश्न तात्पुरत्या उपायांनी सोडवण्याऐवजी कायमस्वरूपी सिस्टम उभी करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे. यासाठी मनुष्यबळ भरती, डॉक्टरांची हजेरी, नागरिकांच्या तक्रारी, रुग्णालयांतील खरेदी प्रक्रिया, डिजिटलायझेशन आणि रक्तपेढ्यांचा दर्जा वाढवणे अशा विविध पातळ्यांवर बदल करण्यात येणार आहेत.

जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांना कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी सेतू पद्धतीनुसार सेवा अधिक सोपी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात आलेले अर्ज, पेंडिंग असलेली प्रकरणे आणि वॉर्डनिहाय कामगिरी यावर डॅशबोर्डद्वारे नजर ठेवली जाणार आहे. दाखला तयार झाल्यावर नागरिकांना एसएमएसद्वारे कळवण्याचेही नियोजन आहे. याशिवाय नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींसाठी असलेल्या मार्ग या यंत्रणेचा विस्तार करण्यात येणार आहे. एखादी तक्रार ठराविक वेळेत निकाली न निघाल्यास ती आपोआप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग होईल, अशी व्यवस्था तयार केली जाणार असल्याचे वर्मा-लवंगारे यांनी सांगितले.

दुसरीकडे, महापालिकेच्या रुग्णालयांतील डॉक्टरांच्या हजेरीवरही प्रशासनाची कडक नजर राहणार आहे. बायोमेट्रिक हजेरी अधिक प्रभावी करत, हजेरीत अनियमितता आढळल्यास चौकशी करून नियमानुसार कारवाई केली जाईल. रिक्त पदे भरणे, नव्या डॉक्टरांना ट्रेनिंग देणे, बदलत्या वैद्यकीय गरजांनुसार नव्या पदरचनेचा आकृतीबंध तयार करणे, रुग्णकेंद्रित पीपीपी मॉडेल राबवणे आणि २०२८ पर्यंत सुरू होणाऱ्या नव्या रुग्णालयांसाठी आधीच मनुष्यबळाचे नियोजन करणे, यावरही प्रशासनाचा भर आहे.

रक्तपेढ्यांना पुढील वर्षभरात एनएबीएल मानांकन मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच रुग्णालयांतील स्वच्छता आणि कंत्राटी सेवांचा दर्जा तपासण्यासाठी पुढील काळात तृतीय पक्षाकडून तपासणी करण्याचे नियोजन आहे. औषधे आणि उपकरणांच्या खरेदीपासून थेट रुग्णसेवेपर्यंत, प्रत्येक टप्प्यावर होणारा विलंब शोधून तो कमी करण्यासाठी डिजिटल डॅशबोर्ड यंत्रणा विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ