मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडीमुळे संतापले प्रशांत पवार; लोकप्रतिनिधींना जाब विचारणारी पोस्ट व्हायरल
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदाही मुंबई-गोवा महामार्गावर कोंडीचा फटका बसला असून, उद्योजक प्रशांत पवार यांनी फेसबुक पोस्टवरून थेट लोकप्रतिनिधींना जाब विचारला आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात परतणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते आणि दरवर्षी याच काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागतात. यंदाही हीच परिस्थिती पुन्हा दिसून आली आणि रस्त्यांची दुरवस्था तसेच वाहतूक कोंडीमुळे कोकणवासीयांचा राग पुन्हा एकदा उफाळून आला. या पार्श्वभूमीवर उद्योजक वामनराव पवार यांचे सुपुत्र आणि स्वतः उद्योजक असलेले प्रशांत पवार यांनी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात फिरत आहे.
शिरगावहून आलेल्या या बातमीनुसार, महामार्गावर अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. याच मुद्द्यावर बोट ठेवत प्रशांत पवार यांनी थेट प्रश्न विचारला, "वाहतूक पोलीस विभाग नेमके काय करत आहे? महाराष्ट्रातील मंत्री, आमदार आणि खासदारांकडे या परिस्थितीचे काय उत्तर आहे?" त्यांनी केवळ आश्वासनांवर बोळवण करणाऱ्या राजकारणावरही नाराजी व्यक्त केली. "फक्त आश्वासने नकोत, आता प्रत्यक्ष कृती हवी," अशी ठाम भूमिका मांडत रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, असा सवालही त्यांनी केला.
या पोस्टवर 'कालनिर्णय'चे संपादक जयेंद्र साळगावकर यांनी टिप्पणी केली, "कोकणाकडे खास लक्ष कोण देत नाहीत... आणि कोकणी जनता एकजूट दाखवत नाहीत." कोल्हापुरातील जनतेने पक्षीय निष्ठा बाजूला ठेवून टोलविरोधात एकत्र लढा दिल्याचा दाखला देत, कोकणातही पक्षभेद विसरून लोकांनी आपल्या प्रश्नांसाठी एकत्र यायला हवे, असे त्यांनी नमूद केले. सहा-सात वर्षांपूर्वी आपण हाच मुद्दा उचलला होता आणि तेव्हा आपली भूमिका वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापून आली होती, मात्र अपेक्षेइतका प्रतिसाद कोणाकडूनही मिळाला नाही, अशी खंतही साळगावकर यांनी बोलून दाखवली.
साळगावकर यांच्या या प्रतिक्रियेला उत्तर देताना प्रशांत पवार यांनीही कोकणाच्या प्रश्नांसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची वेळ आल्याचे स्पष्ट केले. मुंबई-गोवा महामार्गाबाबत वर्षानुवर्षे आश्वासने मिळत राहिली असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही महामार्ग पूर्ण करण्याबाबत अनेकदा शब्द दिला होता. मात्र सरकारे बदलली, पक्ष बदलले, सत्ता आली आणि गेली, तरी महामार्गाचा प्रश्न जैसे थे असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. "कोकणातील जनतेने एकत्र येऊन आपल्या आमदार-खासदारांना थेट प्रश्न विचारला पाहिजे. कोकणासाठी ठोस कृती का होत नाही?" असे ते म्हणाले.
ही भूमिका कोणत्याही एका पक्षाविरोधात नसल्याचे स्पष्ट करत, कोकणाच्या बाजूने उभा राहणारा आवाज आता बुलंद व्हायला हवा, असे प्रशांत पवार यांनी म्हटले. विद्यमान लोकप्रतिनिधी कोकणाचे प्रश्न प्रभावीपणे मांडू शकत नसतील, तर पर्याय शोधण्याची वेळ आली आहे, असा थेट इशाराही त्यांनी दिला. "पक्ष नंतर... कोकण आधी! आश्वासने नकोत... कृती हवी! आवाज झाला पाहिजे... आणि तो एकजुटीचा झाला पाहिजे!" अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली. या पोस्टमुळे कोकणातील रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.