गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:40 IST

बाप्पासाठी कोकणात निघालेल्यांना फटका, मुंबई-गोवा महामार्गावर माणगावात वाहनांच्या लांबलचक रांगा

गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांच्या गर्दीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा, इंदापूर आणि माणगाव भागात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

बाप्पासाठी कोकणात निघालेल्यांना फटका, मुंबई-गोवा महामार्गावर माणगावात वाहनांच्या लांबलचक रांगा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गणरायाच्या आगमनाला अवघे दोन दिवस उरले असताना मुंबई आणि आसपासच्या भागातून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी एकदम वाढली आहे. हजारो गणेशभक्त खासगी गाड्यांनी गावाकडे निघाल्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण आला आहे. खारपाडा, इंदापूर आणि माणगाव या भागांत गाड्यांच्या रांगा लांबच लांब पसरल्याचं चित्र दिसतंय.

सोमवारी, १४ सप्टेंबरला घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यामुळे शनिवारपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि जवळपासच्या भागातील कोकणवासीयांनी गावाकडे प्रवास सुरू केला आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गाड्या महामार्गावर आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक अगदी संथ गतीने सुरू आहे.

माणगाव भागात कोंडीची तीव्रता सर्वात जास्त असल्याचं दिसतंय. काही ठिकाणी गाड्यांच्या रांगा कित्येक किलोमीटरपर्यंत लागल्या आहेत. महाडच्या दिशेने गाड्या हळूहळू पुढे सरकत असून वेग मंदावल्यामुळे प्रवाशांना मोठा खोळंबा सहन करावा लागतोय. कुटुंबासह कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसतोय. नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने अनेकांचं गाव गाठण्याचं नियोजनच कोलमडलं आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचं काम अनेक ठिकाणी अजूनही अपूर्ण असल्यामुळे गणेशोत्सवातल्या वाढत्या वाहतुकीचा ताण जास्तच जाणवतोय. नागोठणे भागातल्या सर्व्हिस रोडवर खड्डे असल्याने गाड्यांचा वेग मंदावतोय, तर इंदापूर भागात काही ठिकाणी सिंगल लेनमधून वाहतूक सुरू असल्यामुळे रांगा लागतायत. महामार्गावरच्या या अडथळ्यांसोबतच अचानक वाढलेली गाड्यांची संख्या यामुळे परिस्थिती आणखी बिकट झालीय.

या कोंडीला काही बेशिस्त वाहनचालकही कारणीभूत ठरत असल्याचं समोर आलंय. कोकणाच्या दिशेने जाण्यासाठी काही चालक मुंबईकडे येणाऱ्या लेनमध्ये राँग साईडने गाड्या घुसवत आहेत. यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम होतोय आणि पोलिसांना कोंडी सोडवणं जास्त कठीण जातंय. कोंडीतून लवकर बाहेर पडण्याच्या नादात वाहनचालकांनी नियम मोडले तर त्याचा फटका इतर हजारो प्रवाशांना बसतो, असं चित्र आहे.

खारपाडा, इंदापूर, माणगाव आणि महामार्गावरच्या इतर महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू आहे. गाड्या योग्य लेनमधून पुढे पाठवून कोंडी कमी करण्यावर भर दिला जातोय. पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांनी वाहनचालकांना राँग साईडने गाड्या नेऊ नयेत आणि वाहतुकीचे नियम पाळावेत, असं आवाहन केलं आहे. एका गाडीने नियम मोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम संपूर्ण महामार्गावरील वाहतुकीवर होऊ शकतो, त्यामुळे चालकांनी संयम ठेवावा अशी गरज व्यक्त करण्यात आलीय.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पुढचे काही तास महामार्गावरील वाहतुकीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी शक्य तितकं नियोजन करून प्रवास करावा, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात येतंय.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ