चंद्रपूर पोलीस दलासाठी जमीन संपादनाकरिता ३० कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने डॉग स्क्वॉड सेंटर, भरती मैदान, बीडीडीएस सेंटर व पोलीस निवासासाठी राखीव जमीन ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूर पोलीस दलाला अधिक बळकट करण्यासाठी आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या प्रयत्नांतून चंद्रपूर पोलीस विभागासाठी राखीव असलेल्या जमिनीच्या भूसंपादनाकरिता ३० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
नवीन चंद्रपूर विकास योजनेत पोलीस विभागासाठी राखीव ठेवलेल्या जागेचा वापर आता डॉग स्क्वॉड ट्रेनिंग सेंटर, पोलीस भरतीसाठी लागणारे शारीरिक मैदान, प्रशिक्षण केंद्र, बीडीडीएस ट्रेनिंग सेंटर, इनडोअर फायरिंग बट आणि पोलीस अधिकारी-अंमलदारांसाठी शासकीय निवासस्थान अशा विविध कामांसाठी होणार आहे. नवीन चंद्रपुरातील या पायाभूत सुविधा उभारणीसाठी लागणारी जमीन मिळावी म्हणून झालेली ही प्रशासकीय कार्यवाही चंद्रपूरच्या पोलीस यंत्रणेला बळ देणारी ठरणार आहे.
नवीन चंद्रपूर विकास योजनेतील मौजा कोसारा येथील आरक्षण क्रमांक ११० मधील ८.३० हेक्टर जमीन आणि मौजा दाताळा येथील आरक्षण क्रमांक १३३ मधील १२.२५ हेक्टर जमीन, अशी पोलीस विभागाच्या आरक्षणामुळे बाधित झालेली जमीन आता संपादित केली जाणार आहे. या जागेवर डॉग स्क्वॉडच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र सुविधा, भरती प्रक्रियेसाठी मैदान, प्रशिक्षण केंद्र, बीडीडीएस प्रशिक्षण केंद्र, इनडोअर फायरिंग बट, अधिकारी-अंमलदारांसाठी निवासस्थान आणि इतर आवश्यक बांधकामे उभारली जातील.
चोवीस तास कार्यरत असणाऱ्या पोलीस दलाला प्रशिक्षणापासून निवासापर्यंत आणि कौशल्यविकासापासून रोजच्या कामकाजासाठी लागणाऱ्या सुविधांपर्यंत सर्व बाबतीत सक्षम पायाभूत सुविधा मिळणे गरजेचे असते. हीच बाब लक्षात घेत आ. मुनगंटीवार यांनी पोलीस दलाच्या गरजांकडे नेहमीच लक्ष दिले आहे. पोलीस स्टेशनच्या इमारती आणि कर्मचाऱ्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता प्रशिक्षण व इतर सुविधांसाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
पोलीस अधिकारी व अंमलदारांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आ. मुनगंटीवार यांनी वेळोवेळी शासनदरबारी भूमिका मांडली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासाचा निधी मिळवून देणे, नव्या पोलीस स्टेशन इमारतींसाठी प्रयत्न करणे आणि प्रलंबित डीजी लोन योजनेचा प्रश्न विधानसभेत मांडणे, यातून त्यांनी पोलीस दलाच्या मूलभूत गरजांना सातत्याने प्राधान्य दिले आहे.
नवीन चंद्रपूर विकास योजनेतील मौजा कोसारा येथील आरक्षण क्रमांक ११० मधील ८.३० हेक्टर आणि मौजा दाताळा येथील आरक्षण क्रमांक १३३ मधील १२.२५ हेक्टर या पोलीस आरक्षणाने बाधित जमिनीच्या भूसंपादनासाठी याआधीच ४३ कोटी ६५ लाख ८३ हजार १६ रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी आता ३० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यामुळे या सुविधांसाठी लागणारी जमीन ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संबंधित शासन निर्णयानुसार या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. केवळ आधुनिक कार्यालयीन सुविधाच नव्हे, तर प्रशिक्षण, तंत्रज्ञान, निवास आणि कार्यक्षमतेसाठी लागणाऱ्या सर्वसमावेशक पायाभूत सुविधा चंद्रपूरच्या पोलीस यंत्रणेला मिळाव्यात, या दृष्टिकोनातून आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ही कार्यवाही झाली आहे. यामुळे भविष्यात चंद्रपूरच्या पोलीस दलाच्या क्षमतेत वाढ होण्यासोबतच अधिकारी व अंमलदारांच्या सुविधांमध्येही मोठी भर पडणार आहे.