गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:00 IST

MPSC पेपरफुटी: सचिव हरपाळकरांच्या तोंडाला काळं, संभाजी ब्रिगेडचे तीन कार्यकर्ते अटकेत

नवी मुंबईत MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासल्याची घटना, संभाजी ब्रिगेडने कारवाईचं समर्थन करत अध्यक्षांनाही राजीनामा देण्याचा इशारा दिला.

MPSC पेपरफुटी: सचिव हरपाळकरांच्या तोंडाला काळं, संभाजी ब्रिगेडचे तीन कार्यकर्ते अटकेत छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये पेपरफुटी झाल्याच्या आरोपावरून राज्यात वाद पेटलेला असतानाच, संभाजी ब्रिगेडने या मुद्द्यावर थेट रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेतली आहे. नवी मुंबईत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासल्याची घटना घडली असून, यामुळे आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली असल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

या कारवाईनंतर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रवक्ते संतोष शिंदे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. MPSCचा अभ्यास करणाऱ्या 25 लाख विद्यार्थ्यांच्या आणि राज्यातील 12 कोटी जनतेच्या वतीने ही कारवाई करण्यात आल्याचं ते म्हणाले. हरपाळकर यांच्या गालावर मारलेली थप्पड ही प्रत्यक्षात सरकारच्याच गालावर जनतेने लगावलेली थप्पड असल्याचं वक्तव्यही शिंदे यांनी केलं.

संभाजी ब्रिगेडचं हे आंदोलन नवीन नाही. अन्न व औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीवरून संघटनेने याआधीही रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला होता. 3 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करत सरकारला स्पष्ट इशारा देण्यात आला होता. मात्र या प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने पाहिलं नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

सरकारला ज्या भाषेत समजतं, त्याच भाषेत सांगावं लागतं, असं सांगत संतोष शिंदे यांनी MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. राजीनामा दिला नाही तर पुढचा नंबर थेट MPSC अध्यक्षांचा असेल, असा इशाराही त्यांनी दिला. आजची कारवाई ही केवळ सुरुवात असून अध्यक्षांवरील कारवाई अद्याप बाकी आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी आणखी आक्रमक वक्तव्य केलं. प्रश्नपत्रिका फुटत राहिल्या, परीक्षा रद्द होत राहिल्या आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होत राहिलं, तर याविरोधात आणखी किती वर्षं वाट पाहायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली. आंदोलन आणि चर्चा या लोकशाही मार्गानेच व्हायला हव्यात, काळं फासणं किंवा शाई फेकणं हे योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, हीच आपली भूमिका असल्याचंही सुळे यांनी सांगितलं.

महेंद्र हरपाळकर हे डिसेंबर 2025 पासून MPSCच्या सचिवपदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर काम केलं होतं. अन्न व औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीबाबतच्या तक्रारीनंतर, तक्रारदाराने ती तक्रार मागे घेतल्याची माहिती हरपाळकर यांनीच दिली होती. ते 1995 सालापासून प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं जातं.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ