मोदींच्या फोटो वादावरून केडीएमसी महासभा तहकूब; मनसेचा भाजपला सत्ता सोडण्याचा टोला
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुण्यातील एका शाळेत मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढल्याचे प्रकरण घडले होते. या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी, 9 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत उमटले. या मुद्द्यावरून सभागृहात चांगलाच गोंधळ झाला आणि अखेर महासभा तहकूब करावी लागली.
महासभेत भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी मोदींच्या फोटोचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत त्यांनी महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. महापौर हर्षाली चौधरी यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगत महासभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या या मागणीला शिवसेना शिंदे गटासोबतच शिवसेना ठाकरे गटानेही पाठिंबा दिला हे विशेष. मात्र मनसे आणि काँग्रेसने सभा तहकूब करण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध केला आणि भाजपवर टीकेची झोड उठवली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सध्या शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसे एकत्रितपणे सत्तेत आहेत. पुण्यातील फोटोप्रकरणानंतर भाजपने मनसेला सत्तेतून बाहेर काढण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाकडे केली होती. पण शिंदे गटाने ही मागणी फेटाळली, उलट या मुद्द्यावर भाजपच्याच भूमिकेवर टीका झाली होती. त्यामुळे केडीएमसीच्या महासभेत भाजप नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी महासभा तहकूब करण्याच्या निर्णयावरून भाजपला लक्ष्य केले. महासभा ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बोलावली जाते, राजकीय मुद्द्यावरून ती तहकूब करणे म्हणजे निव्वळ नाटक असल्याची टीका त्यांनी केली. मनसेला भाजपचा एवढाच विरोध असेल तर भाजपने सत्तेतून का बाहेर पडू नये, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्तेत राहायचे आणि त्याचवेळी विरोधही दाखवायचा, ही भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
मनसेचे गटनेते प्रल्हाद म्हात्रे यांनीही सभागृहात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. एवढा विरोध असेल तर सत्तेतून बाहेर का पडत नाही, सत्तेची मलाई खाण्यासाठीच तुम्ही सत्तेत आहात, महापौर आम्ही बसवला आहे आणि आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे तुम्हीच सत्तेतून बाहेर पडा, अशा शब्दांत म्हात्रे यांनी भाजपला थेट आव्हान दिले.
मोदींच्या फोटोप्रकरणामुळे केडीएमसीतील सत्ताधारी युतीमधील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. एकीकडे शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसेची सत्ता कायम असताना, दुसरीकडे राजकीय मुद्द्यांवरून या तिन्ही पक्षांमध्ये सतत खटके उडत असल्याचे चित्र दिसते आहे. महासभा तहकूब करण्याच्या मुद्द्यावरून मनसेने थेट भाजपलाच सत्तेतून बाहेर पडण्याचे आव्हान दिल्याने हा वाद अधिक चिघळला आहे. या वादाचा पुढील काळात केडीएमसीतील सत्तासमीकरणावर आणि तिन्ही पक्षांच्या परस्पर संबंधांवर काय परिणाम होतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.