मिरा रोडच्या शाळेत कांदा-लसूण बंदी, आमदार मेहतांच्या शाळेवरून वाद, मनसेची तक्रार
पर्युषण पर्वाच्या निमित्ताने मिरा रोडमधल्या सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेने डब्यात कांदा-लसूण आणण्यावर बंदी घातली, त्यावरून वाद पेटलाय.
मिरा रोडमधल्या एका नामांकित शाळेने घातलेल्या एका नियमामुळे सध्या राज्यात मोठा वाद सुरू झालाय. शाळा म्हणजे फक्त पुस्तकं आणि परीक्षा नाही, तर तिथे समानता आणि दुसऱ्याच्या विचारांचा आदर करायला शिकवलं जातं, असं मानलं जातं. पण इथे उलटंच झालं - विद्यार्थ्यांच्या डब्यात काय आणायचं आणि काय नाही, हे शाळेनेच ठरवून टाकलं.
सेव्हन स्क्वेअर अकॅडमी या शाळेने जैन धर्मातल्या पर्युषण पर्वाच्या निमित्ताने एक पत्रक काढलं. या पत्रकानुसार 16 सप्टेंबरपर्यंत शाळेतल्या कुठल्याही विद्यार्थ्याने डब्यात कांदा, लसूण, बीट, बटाटा किंवा जमिनीखाली उगवणारी इतर कंदमुळं आणायची नाहीत, असं फर्मान काढलंय. एवढंच नाही, तर शाळेच्या कॅन्टीनमध्येही या दिवसांत असे पदार्थ मिळणार नाहीत, हे स्पष्ट सांगितलंय.
ही शाळा भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कुटुंबाची खासगी शाळा असल्याचं स्थानिक लोक सांगतात. त्यामुळे हा नियम म्हणजे एका धर्माची प्रथा सगळ्यांवर लादण्याचा प्रकार आहे, अशी टीका होतेय. या विरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केलीय आणि शाळेवर कारवाई करा, अशी मागणी केलीय. मुलांच्या जेवणावर शाळा असं बंधन घालूच कशी शकते, हा प्रश्न आता विचारला जातोय.
जैन धर्मात पर्युषण पर्वाला खूप महत्त्व आहे. या काळात अहिंसा आणि दयेचा संदेश दिला जातो, आणि जमिनीखालच्या बारीक जीवांना इजा होऊ नये म्हणून कंदमुळं टाळली जातात. हे तत्त्वज्ञान मान्यच आहे, आणि जैन विद्यार्थ्यांसाठी शाळेने काही व्यवस्था करणं यात काहीच गैर नाही. पण एका गटाच्या श्रद्धेचा मान राखताना बाकीच्या विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं कितपत बरोबर आहे, हा खरा प्रश्न आहे.
एखादं कुटुंब स्वतःहून पर्युषणात कांदा-लसूण टाळत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय झाला. पण त्याच शाळेतल्या इतर विद्यार्थ्यांना विचारात न घेता सरसकट बंदी लादणं म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण ठरतं. उद्या श्रावणात मांसाहार बंद करा, अमुक जातीत अमुक दिवशी कंदमुळं खाऊ नका, असे नियम आले तर शाळा कशी चालणार, असाही प्रश्न उपस्थित होतोय. शाळा कुठल्या एका धर्माची नसते, ती सगळ्या धर्मांच्या मुलांची असते.
या प्रकरणाला हिंदू विरुद्ध जैन असं वळण देणं धोकादायक ठरू शकतं. मुद्दा कुठला धर्म मोठा हा नाहीच, तर शाळेचे नियम कशाच्या आधारावर असावेत हा आहे. आरोग्य, सुरक्षितता आणि मुलांची शारीरिक-मानसिक वाढ या निकषांवर नियम असायला हवेत, धार्मिक आधारावर सगळ्यांचं जेवण ठरवणं शिक्षण खात्याच्या नियमांत बसतं का, हे तपासायला हवं.
पर्युषणाचा मूळ अर्थ म्हणजे मिच्छामी दुक्कडम् - म्हणजे कुणाचंही मन न दुखावता क्षमा मागणे. मग हाच संदेश मुलांवर बंधनं लादून कसा पोहोचणार? नियम आरोग्याशी संबंधित असते तर पालकांनीही स्वागत केलं असतं, पण फक्त एका सणाच्या नावाखाली सगळ्यांवर तो लादणं चुकीचं आहे. श्रद्धेचा आदर सक्तीतून नाही, तर संवादातून आणि स्वतःहून यायला हवा.