नाशिकमध्ये म्हाडाची 324 घरे आता लॉटरीशिवाय, आधी अर्ज त्याला घर
म्हाडाच्या नाशिक मंडळाने 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील शिल्लक घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर विक्रीला काढली आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
म्हाडाचा फ्लॅट घ्यायचा असेल तर आता लॉटरीचा नंबर लागायची वाट बघायची गरज नाही. म्हाडाच्या नाशिक मंडळाने 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत आधीच्या लॉटरीत विकल्या न गेलेल्या घरांची विक्री सुरू केली आहे. अशी एकूण 324 घरे शिल्लक होती आणि ती आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने दिली जाणार आहेत. म्हणजे जो अर्जदार आधी अर्ज भरेल, त्यालाच घर मिळण्याची संधी असेल.
या घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार, 8 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली आहे. ही घरे नाशिकमधल्या वेगवेगळ्या भागांत आहेत. अवध युटोपीया राधा नगर, बजरंग नगर, विहितगाव शिवार, श्री विठ्ठल टॉवर्स ब्रीज नगर, पाथर्डी गाव, ग्लोबल विले म्हसरुळ गाव, आनंदसागर अनेक्स फेज 1, शिवसृष्टी नगर, भाविक मिथिला टाकळी रोड, शिल्प मधुवन संभाजी नगर, राधा नगरी, साई सृष्टी खर्जुल सर्कल, द नॉर्थलॅण्ड मोरडे नगर, प्रणव गार्डन महालक्ष्मी नगर आणि श्याम अॅव्हेन्यु आगरटाकळी शिवार अशा ठिकाणी ही घरे आहेत.
तारखांचं वेळापत्रकही म्हाडाने जाहीर केलं आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी 8 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून ती 12 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत चालणार आहे. ऑनलाइन अनामत रक्कम भरून योजना निश्चित करण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल आणि तीही 12 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरू राहील. एकदा सदनिका निवडली की त्यानंतर 48 तासांच्या आत प्रशासकीय रक्कमेचा पहिला हप्ता भरावा लागणार आहे.
अर्ज करण्यासाठी अर्जदाराने म्हाडाच्या bookmyhome.mhada.gov.in या वेबसाईटवर जाऊन आधी स्वतःची नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर सगळी माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. या लॉटरीबद्दलची सविस्तर जाहिरात म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज भरण्याआधी ही जाहिरात नीट वाचून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
प्रत्येक अर्जासाठी अनामत रक्कम भरणं बंधनकारक आहे. अत्यल्प उत्पन्न गटातल्या अर्जदारांना 5000 रुपये अधिक 708 रुपये असे मिळून एकूण 5708 रुपये भरावे लागणार आहेत, यात 600 रुपये अर्ज शुल्क आणि त्यावरचा 18 टक्के जीएसटी म्हणजे 108 रुपये यांचा समावेश आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी ही रक्कम 10708 रुपये इतकी आहे.