गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:42 IST

रुग्णांच्या सूचनांतून कॅन्सर रुग्णालय सुधारणार - सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरच्या पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सूचनापेटी सुरू, जिवतीच्या रुग्ण दाम्पत्याच्या हस्ते उद्घाटन

रुग्णांच्या सूचनांतून कॅन्सर रुग्णालय सुधारणार - सुधीर मुनगंटीवार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देताना रुग्णासोबत त्याचे संपूर्ण कुटुंबही चिंता आणि प्रश्न घेऊन रुग्णालयात येत असते. रुग्णाला उपचारांबरोबरच विश्वास, आपुलकी आणि आधार मिळावा, त्याच्या अडचणी आणि अपेक्षा समजून घेऊन सेवेत सातत्याने सुधारणा व्हावी, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने चंद्रपूरच्या पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सूचनापेटी सुरू करण्यात आली आहे.

जिवती तालुक्यातील लांबबोरी येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण रुक्मिणीबाई आकृपी आणि शंकर आकृपी यांच्या हस्ते फित कापून या सूचनापेटीचे उद्घाटन करण्यात आले. रुग्णांच्याच हस्ते हे उद्घाटन होणे समाधानाची बाब असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले. रुग्णांच्या सूचना आणि अनुभवांतून रुग्णालय अधिक सक्षम, संवेदनशील आणि रुग्णाभिमुख करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या सूचनापेटीतून रुग्ण आणि नातेवाईकांना सेवा, सुविधा, अडचणी तसेच आवश्यक सुधारणांबाबत थेट सूचना मांडता येतील, असे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. या पेटीत केवळ तक्रारी नोंदवू नयेत, तर रुग्णालय अधिक चांगले कसे करता येईल, आणखी कोणत्या सुविधा द्याव्यात आणि उपचाराची प्रक्रिया सुलभ कशी करता येईल, याबद्दलच्या सूचनाही द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. रुग्णांच्या अनुभवातून मिळणारा अभिप्राय रुग्णालयाच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी मुंबईसारख्या दूरच्या शहरांत जावे लागू नये, यासाठी आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा करत चंद्रपूरमध्ये अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा आग्रह शासनाकडे धरला होता. 2014 मध्ये अर्थमंत्री झाल्यापासून त्यांनी हा विषय प्राधान्याने लावून धरला. खनिज विकास निधी आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने साकारलेल्या या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, हे रुग्णालय पूर्व विदर्भातील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे. हे रुग्णालय केवळ अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज न राहता राज्यातील आदर्श आणि रुग्णाभिमुख कॅन्सर उपचार केंद्र म्हणून नावारूपास यावे, यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले.

रुग्णालयात येणारे कॅन्सरचे रुग्ण मनात चिंता आणि भीती घेऊन येतात, मात्र अत्याधुनिक उपचारपद्धती, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आणि आपुलकीच्या वातावरणामुळे ते चिंतामुक्त होऊन, आत्मविश्वासाने आणि नव्या आशेने परत जावेत, अशी रुग्णालयाची कार्यपद्धती असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रुग्णालयाची खरी ओळख केवळ यंत्रसामग्रीने नव्हे, तर दर्जेदार उपचार, विश्वासार्ह सेवा आणि आपुलकीच्या वातावरणातून तयार होते, त्यामुळे रुग्णांच्या प्रत्येक अनुभवाकडे गांभीर्याने पाहून सुधारणा कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

रुग्णालयात एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. जीवनदायी योजनेअंतर्गत ऑपरेशननंतर रुग्णांना मिळणारी आर्थिक मदत विलंब न होता तातडीने मिळावी, यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. लकवा आणि कॅन्सरसारख्या आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना शासनाची मदत वेळेत मिळावी आणि आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचावा, यावर त्यांनी भर दिला.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत करण्यात आली असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचेही लवकरच लोकार्पण होणार आहे. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून बल्लारपूर येथेही रुग्णालय उभारले जात आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक जागा मिळाल्यास एआय तंत्रज्ञानाचा वापर करून रोबोटिक सर्जरीसह उच्च दर्जाच्या उपचार सुविधा देणारे आधुनिक रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आ. मुनगंटीवार म्हणाले.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाने सुरू असलेले हे रुग्णालय समाजातील शेवटच्या पंक्तीतील वंचित, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देणारे उत्कृष्ट केंद्र म्हणून विकसित व्हावे, ही आपली भूमिका असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. ही सूचनापेटी केवळ तक्रारी नोंदविण्याचे साधन न राहता रुग्णांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविणारे आणि सेवेला अधिक चांगली दिशा देणारे प्रभावी माध्यम ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यादरम्यान, कॅन्सर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सच्या बांधकामासाठी आवश्यक जागेची पाहणीही करण्यात आली. अधिकारी-कर्मचारी निवासस्थान, धर्मशाळा व परिचारिका निवासव्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी संबंधितांना दिल्या.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ