काळ्या काचांच्या वाहनांवर माळेगाव पोलिसांचा दणका; काचा उतरवून दंडात्मक कारवाई, नियमभंग करणारी वाहने केली डिटेन
माळेगाव शहरात काळ्या काचांच्या वाहनांविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र, काचा जागच्या जागी उतरवून दंड वसूल, तर वारंवार नियमभंग करणारी वाहने डिटेन.
माळेगाव शहरात वाहनांना काळ्या काचा लावून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध माळेगाव पोलिसांनी कारवाईची मोहीम आणखी तीव्र केली आहे. काळ्या काचा लावलेल्या वाहनांच्या काचा जागच्या जागी उतरवून संबंधित चालकांकडून दंड वसूल केला जात आहे, तर वारंवार नियमभंग करणारी काही वाहने थेट डिटेन करण्यात आली आहेत.
माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध चौकांत वाहनांची तपासणी सुरू आहे. शहरातील इंजिनिअरिंग कॉलेज परिसर आणि राजहंस चौक यासह प्रमुख रस्त्यांवर गेल्या दोन दिवसांपासून ही मोहीम विशेषतः अधिक कडक करण्यात आली आहे. या चौकांमधून जाणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून बारकाईने तपासणी केली जात आहे.
याआधीही पोलिसांनी अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली होती, पण त्यानंतरही काही वाहनचालक पुन्हा वाहनांना काळ्या काचा लावत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे केवळ दंड आकारून थांबण्याऐवजी आता पोलिसांनी वाहनांवरील काळ्या काचा प्रत्यक्ष काढून टाकणे आणि गरज पडल्यास संबंधित वाहने डिटेन करणे असे कठोर पाऊल उचलले आहे.
या मोहिमेदरम्यान केवळ काळ्या काचा असलेल्या वाहनांवरच नव्हे, तर नंबर प्लेट झाकणारी, नंबर प्लेटवर अगदी बारीक अक्षरांत क्रमांक लिहिणारी किंवा नंबर प्लेटमध्ये अनधिकृत बदल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारी वाहनेही पोलिसांच्या रडारवर आहेत. अशा प्रकारे नंबर प्लेटशी छेडछाड करणाऱ्या वाहनचालकांवरही पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
काळ्या काचांचा वापर करून वाहनांतील संशयास्पद हालचाली लपवल्या जाण्याची शक्यता असते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालणे, वाहनांतून होणाऱ्या संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखणे या उद्देशाने ही मोहीम राबवली जात असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्यासह वाहतूक पोलीस हवालदार सचिन होळकर, काका पाटोळे, संदीप वाघमोडे, अमजद शेख आणि गणेश खंडागळे यांचा सहभाग होता.