मढ-वर्सोवा केबल पुलाला हायकोर्टाची हिरवी झेंडी, खारफुटी तोडणीस सशर्त मंजुरी
मुंबई उच्च न्यायालयाने मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलासाठी १,२३७ खारफुटी झाडे तोडण्यास सशर्त परवानगी दिल्याने २,३९५ कोटींच्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मढ आयलंड आणि वर्सोवा यांना थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी केबल-स्टेड पुलाच्या कामातला मोठा अडथळा आता दूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकल्पासाठी आड येणारी १,२३७ खारफुटीची झाडे तोडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. यामुळे सुमारे २,३९५ कोटी रुपये खर्चाच्या या पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने ही परवानगी दिली, पण त्यासोबत पर्यावरणाशी संबंधित विविध प्राधिकरणांनी घातलेल्या अटी पाळण्याचे निर्देशही दिले आहेत.
सध्या वर्सोवाहून रस्त्याने मढला जायचं झालं तर वाहनचालकांना मोठा वळसा घ्यावा लागतो. अंधेरी, जोगेश्वरी, राम मंदिर, ओशिवरा आणि मलाडमार्गे मढ-मार्वे रोडपर्यंत पोहोचावं लागतं आणि वाटेत ट्रॅफिक लागलं तर वेळ आणखी वाढतो. वर्सोवा जेटी ते मढ या दरम्यान फेरीबोटीचा पर्यायही आहे, पण भरती-ओहोटीनुसार, खासकरून कमी भरतीच्या वेळी ही सेवा मर्यादित राहते. याच अडचणीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून मढ आणि वर्सोवाला रस्त्याने कायमचं जोडणाऱ्या पुलाचा प्रस्ताव पुढे आला होता.
या प्रकल्पात मलाड खाडीवर २,०६४ मीटर लांबीचा चारपदरी केबल-स्टेड पूल बांधला जाणार आहे, जो मढ आयलंड आणि वर्सोवा यांना थेट जोडेल. पुढे हा पूल २७.४५ मीटर रुंदीच्या विकास आराखडा रस्त्याला आणि नियोजित कोस्टल रोडलाही जोडला जाईल. मढ-वर्सोवामधली थेट कनेक्टिव्हिटी वाढण्यासोबतच पश्चिम उपनगरातल्या मुख्य रस्त्यांवरचा वाहतुकीचा ताण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. एस. व्ही. रोड आणि लिंक रोडवरची गर्दी दुसरीकडे वळवण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरेल, अशी भूमिका महापालिकेने कोर्टात मांडली.
प्रकल्पासाठी लागणाऱ्या पर्यावरणीय मंजुऱ्या मिळाल्याचं महापालिकेने न्यायालयाला सांगितलं. तोडल्या जाणाऱ्या खारफुटींची भरपाई म्हणून उत्तर कोकण खारफुटी विभागाच्या अखत्यारीतील सुमारे नऊ हेक्टर जागेत ३९ हजार खारफुटीची रोपं लावली जाणार आहेत. या रोपांची पुढची दहा वर्षं देखभाल करण्यासाठी आणि त्यासंबंधीच्या कामांसाठी १.४२ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचंही महापालिकेने कोर्टात सांगितलं.
हा पूल बांधून झाल्यावर मढ आणि वर्सोवामधलं अंतर सुमारे १८ ते २० किलोमीटरने कमी होईल, असा अंदाज आहे. सध्या रस्त्याने हा प्रवास वाहतुकीच्या स्थितीनुसार जवळपास दीड तासाचा होतो. पूल सुरू झाल्यावर हाच प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल आणि सुमारे ७० ते ८० मिनिटांची बचत होईल, असा दावा महापालिकेने केला आहे. या पुलामुळे मढ, मालाड आणि वर्सोवा भागातल्या रहिवाशांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून न्यू लिंक रोड, एस. व्ही. रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचा काही ताणही कमी होण्याची अपेक्षा आहे.