महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचं कुटुंबही सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय? हर्षवर्धन सपकाळ यांचा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट राजीनाम्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्याकडे थेट राजीनाम्याची मागणी केली आहे. "महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचं कुटुंबही सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?" असा सवाल करत सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरलं.
एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांचा मोठा दबदबा होता, अशी आठवण सपकाळ यांनी करून दिली. पण गेल्या काही वर्षांत या पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांचा वापर राजकीय विरोधकांवर दबाव आणण्यासाठी आणि वसुलीसाठी होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी लावला. राज्यातील ही परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारामुळेच निर्माण झाल्याचं सपकाळ म्हणाले.
मंत्री अतुल सावे यांच्या भावाला आणि पुतण्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या हल्ल्याचा दाखला देत सपकाळ यांनी सरकारला जाब विचारला. याआधी जळगावमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढल्याच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. या दोन्ही घटनांचा संदर्भ देत मंत्र्यांच्या कुटुंबियांनाही सुरक्षा मिळत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. "मंत्र्यांचं कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाने कुणाकडे बघायचं?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील गुंडगिरी, ड्रग्ज आणि गँगस्टरचा मुद्दाही सपकाळ यांनी यावेळी मांडला. राजकीय आश्रयामुळे गुंड आणि मवाली उघडपणे फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्र'च्या नुसत्या घोषणांनी हा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी ठोस राजकीय इच्छाशक्ती हवी, असा टोला त्यांनी सरकारला लगावला.
पुणे पोलिसांच्या एका कारवाईचा मुद्दा उपस्थित करत सपकाळ यांनी सरकारवर आणखी निशाणा साधला. अल्पवयीन आरोपींना कारच्या बॉनेटवर बसवून धिंड काढल्याप्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाने पुणे पोलिसांबाबत केलेल्या शिफारशीचा त्यांनी उल्लेख केला. पुणे पोलिसांवरील ही कारवाई म्हणजे फडणवीसांच्या कारभाराची पावतीच असल्याचं ते म्हणाले.
अहिल्यानगर आणि जालना जिल्ह्यातील कथित मारहाणीच्या घटनांचाही सपकाळ यांनी यावेळी उल्लेख केला. गोरक्षणाच्या नावाखाली नागरिकांना अमानुष वागणूक दिली गेल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली. राज्यात गुन्हेगारांना आता कायद्याची भीती उरलेली नाही, असा दावाही त्यांनी केला.
एकंदरीत, महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून काँग्रेसने महायुती सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले असून त्यांनी खुर्ची सोडावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.