जास्त पैसे दिले तरच लवकर राईड? रॅपिडोला CCPA कडून 10 लाखांचा दंड
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) रॅपिडो चालवणाऱ्या Roppen Transportation Services कंपनीला दिशाभूल करणाऱ्या पद्धतींसाठी 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
उशीर झाला आणि दुसरा काही पर्याय नसेल, तेव्हा प्रवासी जलद राईडसाठी जास्त पैसे मोजायला तयार होतात. नेमक्या याच गोष्टीचा गैरफायदा घेतल्याचा ठपका रॅपिडो या लोकप्रिय राईड-शेअरिंग ॲपवर ठेवण्यात आला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) रॅपिडो चालवणाऱ्या Roppen Transportation Services या कंपनीला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रॅपिडोच्या राईड बुकिंग इंटरफेसमध्ये दिशाभूल करणारे मेसेज, अनुचित व्यापारी पद्धती आणि डार्क पॅटर्न्स आढळल्याचं CCPA ने म्हटलं आहे.
CCPA च्या माहितीनुसार, रॅपिडोवर राईड बुक करताना ग्राहकांना 'किंमत जितकी जास्त, राईड मिळण्याची शक्यता तितकी जास्त' आणि 'कॅप्टन 60 रुपयांना स्वीकारत नाहीत, +10, +20, +30 रुपये जोडून पहा' असे मेसेज दाखवले जात होते. म्हणजेच आधी एक भाडं दाखवून नंतर बुकिंगच्या वेळी ग्राहकाला जास्त पैसे द्यायला भाग पाडलं जात होतं.
अशा सूचनांमुळे ग्राहकांच्या मनात भीती निर्माण होते की, जास्त पैसे दिले नाहीत तर राईड मिळणार नाही किंवा उशीर होईल, असं CCPA चं म्हणणं आहे. याच कारणामुळे CCPA ने या पद्धतीला 'कन्फर्म शेमिंग' नावाचा डार्क पॅटर्न मानलं आहे. यात इंटरफेस ग्राहकावर मानसिक दबाव टाकून जास्त पैसे द्यायला भाग पाडतो, असं प्राधिकरणाचं निरीक्षण आहे.
रॅपिडोच्या 'तुमची किंमत निश्चित करा' या स्लायडरवरही CCPA ने आक्षेप घेतला आहे. जास्त भाडं दिल्यास राईड मिळण्याची अधिक शक्यता असल्याचा हिरव्या रंगाचा इशारा दिसत होता, तर कमी भाडं दिल्यास लाल किंवा नारंगी रंगाचा इशारा दिसत होता. शिवाय स्लायडरमध्ये किंमत वाढवण्यासाठी जास्त वाव होता, पण ती कमी करण्यासाठी कमी वाव होता. याला CCPA ने 'इंटरफेस इंटरफिअरन्स' नावाचा आणखी एक डार्क पॅटर्न मानला आहे, ज्याचा अर्थ ॲपची रचनाच ग्राहकांना जास्त किंमत निवडण्यासाठी प्रभावित करत होती.
आगाऊ टिप देण्याच्या पद्धतीवरही CCPA ने आक्षेप घेतला आहे. टिप ही सेवा मिळाल्यानंतर स्वेच्छेने दिली जाणारी रक्कम असते, त्यामुळे राईड सुरू होण्याआधी ती अशा पद्धतीने दाखवता येणार नाही की जास्त किंमत दिल्याने राईड मिळण्याची शक्यता वाढेल, असं प्राधिकरणाने स्पष्ट केलं. यासाठी CCPA ने Motor Vehicle Aggregator Guidelines 2025 चा हवाला दिला असून, त्यानुसार टिपिंगची सुविधा बुकिंगच्या वेळी किंवा राईडदरम्यान नव्हे तर राईड पूर्ण झाल्यावरच उपलब्ध असायला हवी.
रॅपिडोने आपली बाजू मांडताना सांगितलं की हे अतिरिक्त पेमेंट ऐच्छिक असून त्यांचा मॅचिंग अल्गोरिदम या पेमेंटवर अवलंबून नाही. मात्र जास्त पैसे दिल्याने राईड मिळण्याची शक्यता खरोखर वाढते हे सिद्ध करण्यासाठी रॅपिडोने कोणताही डेटा सादर केला नाही, असं CCPA ने नमूद केलं आहे.
CCPA ची ही कारवाई फक्त रॅपिडोपुरती मर्यादित नाही. उबर, ओला, रॅपिडो आणि नम्मा यात्री यासह अनेक राईड-हेलिंग प्लॅटफॉर्मवरील ॲडव्हान्स्ड टिपिंग आणि डार्क पॅटर्न पद्धतींची चौकशी प्राधिकरणाने सुरू केली असून, उबर आणि ओला विरुद्धचा तपासही सध्या सुरू आहे.