गुदमा-प्रताप बाग रेल्वे मार्ग: शेतकऱ्यांच्या जमिनीचे पुनर्मूल्यांकन करून थेट खरेदी करा; खासदार राजेंद्र जैन
गोंदियातील गुदमा-प्रताप बाग रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाबाबत खासदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; जमिनीचे पुनर्मूल्यांकन आणि थेट खरेदीचे निर्देश.
गोंदिया जिल्ह्यात गुदमा ते प्रताप बाग दरम्यान प्रस्तावित असलेल्या नव्या रेल्वे लाईनसाठी जी जमीन संपादित करावी लागणार आहे, त्या भूसंपादनाच्या मुद्द्यावर नुकतीच एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान खासदार राजेंद्र जैन यांनी भूषवले. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन जमिनीचे पुनर्मूल्यांकन म्हणजेच रिव्हॅल्युएशन करावे, तसेच शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदी करण्याबाबत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश खासदार जैन यांनी आज (दि.१६) अधिकाऱ्यांना दिले.
रेल्वे प्रशासनाच्या या प्रकल्पामुळे कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा योग्य व रास्त मोबदला मिळेल, अशी ग्वाही खासदार राजेंद्र जैन यांनी याच बैठकीत दिली.
प्रस्तावित रेल्वे लाईनमुळे मोठ्या संख्येने शेतकरी आणि जमीनधारक प्रभावित होणार आहेत. जमिनीच्या मोजणीदरम्यान अनेक तांत्रिक त्रुटी राहिल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी याआधी केल्या होत्या. त्यावर बैठकीत खासदार राजेंद्र जैन यांनी गोंदियाचे उपविभागीय अधिकारी, नगर रचनाकार आणि रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना मोजणीतील सर्व त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिले.
बैठकीला किसान संघर्ष समितीचे अध्यक्ष अखिलेश सेठ, सचिव अमित बुद्धे, गोपाल चुटे, सुप्रीम बैस, राजू चन्नेकर, जीतलाल लिल्हारे चौरसिया, अय्यूब शेख, सूरज बावनकर, राजेश नागरिकर आणि धनलाल नागपुरे यांच्यासह विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत घेतलेल्या निर्णयांनुसार, सध्याच्या बाजारभावानुसार आणि जमिनीच्या मूल्यांकनानुसार बाधित जमिनीचे पुनर्मूल्यांकन केले जाणार आहे. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरावी यासाठी थेट खरेदी म्हणजेच डायरेक्ट परचेसचा पर्याय स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले. जमीन मोजणीदरम्यान झालेल्या चुका तातडीने दुरुस्त करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले.
या रेल्वे प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या प्रमुख गावांमध्ये गुदमा, आवरीटोला, चुलोद, गोंदिया खुर्द, कटंगी कला, नागरा, चांदनीटोला, गर्रा, सावरी, दागोटोला, दत्तोरा आणि घिवारी या गावांचा समावेश आहे.