गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:36 IST

गोंडवाना विद्यापीठाचा नवा परिसर भविष्यातील गरजांनुसार उभारा - फडणवीस

गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाच्या 186 एकर जागेवरील नव्या संकुलाच्या आराखड्याचे सादरीकरण, मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना

गोंडवाना विद्यापीठाचा नवा परिसर भविष्यातील गरजांनुसार उभारा - फडणवीस
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचा नवा परिसर उभारताना केवळ आजच्या नव्हे तर विद्यापीठाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिल्या. गोंड वास्तुकला आणि आधुनिक शैली यांचा मेळ घालणारा परिसर विकसित करण्याला प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले.

गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठासाठी 186 एकर जागेवर शैक्षणिक संकुल, प्रशासकीय इमारत आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याच्या आराखड्याचे सादरीकरण नागपुरात झाले. या सादरीकरणाच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करत होते.

या बैठकीला राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल, गोंडवाना विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण, वास्तुविशारद जगन्नाथ तावडेकर, विद्यापीठाचे अभियंता जितेंद्र अंबागडे आणि उमेश राठोड उपस्थित होते.

गडचिरोली परिसरात औद्योगिक विकासाला पोषक वातावरण तयार होत असतानाच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व संशोधन उपक्रमांनाही चालना मिळणार असल्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभाराव्यात, असे मुख्यमंत्री म्हणाले. विद्यापीठाच्या इमारतीत गोंड वास्तुकलेचा वारसा जपतानाच आधुनिक शैलीचा संगम असावा यासाठी देशातील व राज्यातील उत्कृष्ट शैक्षणिक इमारतींचा अभ्यास करून सर्वोत्तम परिसर उभारावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

गोंडवाना विद्यापीठ 186 एकर जागेत विकसित होत असून यासाठी सत्तावीस लाख चौरस फूट जागा उपलब्ध झाली आहे. शैक्षणिक व संशोधनाच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर महत्त्वाचा असून विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारतानाच पर्यावरणाच्या दृष्टीनेही परिसर समृद्ध राहावा, असे नियोजन आहे. या विकासकामासाठी 1 हजार 100 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी केंद्र व राज्य शासनाकडून 157 कोटी रुपये आतापर्यंत मंजूर झाले आहेत.

राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांनी विद्यापीठाची इमारत बांधताना ती परिसरातील निसर्गाशी एकरूप असावी आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असावी, अशी सूचना केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने यांनी सांगितले की, संकुल विकसित करताना विद्यार्थ्यांसाठी सुविधा, शैक्षणिक उपक्रम व संशोधन यांचा समावेश असलेली सुंदर इमारत उभारण्याचा प्रयत्न आहे. वास्तुशैलीचा अभ्यास करूनच मुख्य इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे.

या परिसरात पर्यावरणपूरक हरित इमारती, ऊर्जा बचत, सत्तावीस शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक इमारती, कृत्रिम पाणवठे, सहा कोटी लिटर पाणी साठवण क्षमता, औषधी उद्यान आणि विद्यार्थ्यांसाठी पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ