कमरगावात नाली सफाईसाठी युवकाचे ग्रामपंचायत इमारतीवर चढून आंदोलन
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव गावात नाली सफाईच्या प्रलंबित मागणीवरून एका संतप्त युवकाने थेट ग्रामपंचायत इमारतीच्या छतावर चढून आंदोलन केल्याची खळबळजनक घटना घडली. दिनेश नागपुरे असे या आंदोलक युवकाचे नाव असून, मागण्या पूर्ण न झाल्यास भाताच्या पिकावर मारण्याचे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याची धमकी त्यांनी दिली. यामुळे प्रशासन आणि पोलिसांची चांगलीच धांदल उडाली.
कमरगावात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यांची नियमित सफाई झालेली नाही. परिणामी गावात ठिकठिकाणी सांडपाणी तुंबले असून मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. घरांसमोर साचलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. या स्थितीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
नाल्यांची तात्काळ सफाई करावी यासाठी दिनेश नागपुरे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून निवेदने दिली होती. एवढेच नाही तर गोरेगाव पंचायत समिती आणि गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनाही यासंदर्भात निवेदने सादर करण्यात आली होती. मात्र या गंभीर समस्येकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप नागपुरे यांनी केला. वारंवार निवेदने देऊनही आणि पंचायत समिती व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागपुरे यांच्यात प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी होती. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेला कंटाळून अखेर त्यांनी थेट ग्रामपंचायत इमारतीचे छत गाठले आणि आंदोलन सुरू केले.
आंदोलनादरम्यान नागपुरे यांच्याकडे भाताच्या पिकावर फवारणी करण्याचे कीटकनाशक असल्याचे निदर्शनास आले. नाल्यांच्या सफाईबाबत तात्काळ ठोस निर्णय न घेतल्यास हे औषध प्राशन करून जीवन संपवू, असा इशारा त्यांनी दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. छतावर चढून बसलेल्या नागपुरे यांच्या हातातील कीटकनाशकाची बाटली पाहून उपस्थित ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारीही चिंतेत पडले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी जमाव नियंत्रणात आणत नागपुरे यांची समजूत काढण्याचा आणि त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला. या नाट्यमय आंदोलनानंतर तरी ग्रामपंचायत प्रशासन नाल्यांच्या सफाईबाबत काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.