गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:28 IST

गोंदिया: रोजगाराचा शोध रस्त्यावरच संपला! ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

पोटाची खळगी भरण्यासाठी तेलंगणाकडे निघालेल्या मध्य प्रदेशातील मजुरांच्या पिकअप वाहनाला गोंदिया जिल्ह्यातील नागरजवळ भरधाव ट्रकने धडक दिली. यात तीन वर्षांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले.

गोंदिया: रोजगाराचा शोध रस्त्यावरच संपला! ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाला दोन घास सुखाचे मिळावेत या आशेने मध्य प्रदेशातील काही मजूर तेलंगणाच्या दिशेने निघाले होते. रोजगाराच्या शोधात हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबांनी आपले गाव सोडून दूरचा प्रवास सुरू केला होता. पण त्यांचा हा प्रवास गोंदिया जिल्ह्यातील नागरजवळ मध्यरात्रीच्या काळोखात कायमचा थांबला. भरधाव ट्रकने त्यांच्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली आणि यात तीन वर्षांच्या एका चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले.

मृतांमध्ये आरुष मात्रे (३, रा. सावरी, जि. बालाघाट), किरण संतोष वैद्दे (२६, रा. लोडाना), संतोष मात्रे (३८), सुशिला मात्रे (३५, दोघेही रा. किन्ही), रुपसेन सत्यकर (३५) आणि ज्योती सत्यकर (३२) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये भुमेश्वर मात्रे (४७), संगीता मात्रे (३५), राजेंद्र पंचाले (३०), लक्ष्मी पंचाल (२७), संतोष वैद्य (३५), राकेश बाहे (२४) आणि वाहनचालक संदीप बाहे यांचा समावेश आहे. घरची गरिबी दूर करण्यासाठी हे सगळे आपले गाव सोडून निघाले होते आणि दूरच्या तेलंगणात जाऊन काम मिळवण्याच्या आशेवर ते होते.

भरधाव ट्रकच्या धडकेत पिकअप वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला. काही क्षणांपूर्वी एकमेकांशी गप्पा मारणाऱ्या मजुरांमध्ये अचानक किंकाळ्या आणि मदतीसाठी आरडाओरडा सुरू झाला. या दुर्घटनेत तीन वर्षांचा आरुषही मरण पावला. ज्या मुलाच्या भविष्यासाठी कुटुंब रोजगाराच्या शोधात निघाले होते, त्याचेच भविष्य या अपघाताने हिरावून घेतले. रोजगाराच्या शोधात घरापासून दूर निघालेल्या या मजुरांना परतीचा प्रवासही करता आला नाही. या मृत्यूंमुळे सहा जीव तर गेलेच, पण त्यांच्या कुटुंबांचा आधारही हिरावला गेला. तेलंगणात पोहोचून चार पैसे कमवायचे, मुलाबाळांचे शिक्षण करायचे, घरचा संसार नीट चालवायचा अशी छोटी छोटी स्वप्ने घेऊन निघालेल्या या मजुरांच्या स्वप्नांचा शेवट नागरजवळ झाला.

गावात पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने रोजगारासाठी तेलंगणातील जगतीहाल गाठण्याचा निर्णय या मजुरांनी घेतला होता. गावी राहून घर चालवणे कठीण झाल्यानेच त्यांनी हे स्थलांतर करण्याचे ठरवले होते. एका पिकअप वाहनातून सुरू झालेला हा प्रवास कुटुंबीयांसाठी आशेचा किरण घेऊन निघाला होता. पण गोंदिया जिल्ह्यातील नागरजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या स्वप्नांनाच चिरडून टाकले.

अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचा वेग अनियंत्रित होता आणि त्यामुळेच हा अपघात घडल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे. याच मार्गावर गतवर्षी छोट्यामोठ्या अनेक अपघातांच्या घटना घडल्या असून त्यात अनेकांचा बळी गेला आहे, तर अनेकांना जखमी व्हावे लागले आहे. रस्ता आणि मार्गाची स्थिती लक्षात घेता वाहन चालवताना वेग नियंत्रणात ठेवावा, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ