गोंदिया जि.प. इमारत सुरक्षेत त्रुटी: कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात तोडफोड, संगणक चोरीला
सर्व सीसीटीव्ही बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघड
गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील सुरक्षा व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याची घटना १५ सप्टेंबरला उघडकीस आली. चोरट्यांनी थेट बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षाच्या दरवाजाची काच फोडून आत प्रवेश केला आणि तोडफोड केली. या कक्षातील संगणक चोरून नेण्यात आला असून छताचे पंखेही मोडून टाकण्यात आले. एवढेच नाही तर कार्यकारी अभियंत्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणारे कागदही तिथे चिकटवण्यात आल्याचे समोर आले आहे.
११ सप्टेंबरपासून जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सलग सुट्ट्या असल्याने कार्यालय बंद होते. या सुट्ट्यांनंतर आज नियमित कामकाज सुरु होताच हा प्रकार उघडकीस आला, म्हणजेच चोरट्यांनी हे कृत्य याच सुट्टीच्या काळात केल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याहून धक्कादायक बाब म्हणजे लाखो रुपये खर्च करून बसवलेले जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या शासकीय इमारतीत आणि तितक्याच संवेदनशील अशा बांधकाम विभागात एकही कॅमेरा कार्यरत नसणे हा निव्वळ योगायोग आहे की यामागे मोठा कट आहे, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. सर्वच्या सर्व सीसीटीव्ही एकाच वेळी बंद असणे यातून प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
ज्या पद्धतीने थेट कार्यकारी अभियंत्यांच्या दालनाला लक्ष्य करून दाराची काच फोडण्यात आली आणि तिथला संगणक चोरीला गेला, त्यावरून ही केवळ साधी चोरी नसून महत्त्वाची प्रशासकीय कागदपत्रे व पुरावे नष्ट करण्याचा किंवा संबंधित अधिकाऱ्याला धमकावण्याचा प्रयत्न असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जीवालाच धोका निर्माण झाल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरु आहे.
जिल्हा परिषदेसारख्या मुख्यालयात रात्रंदिवस सुरक्षा व्यवस्था असणे अपेक्षित असताना चोरट्यांनी बिनधास्तपणे आत घुसून कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षाचे दार फोडले, शासकीय माहिती असलेला संगणक पळवला आणि कार्यालयातील पंख्यांची मोडतोड करत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले.
घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे अचानक कसे बंद पडले, यामागे कोणाचा हात आहे आणि शासकीय कार्यालयातील महत्त्वाचा डेटा चोरीला जाण्यामागे नेमका कोणता हेतू होता, या सर्व प्रश्नांची निष्पक्ष चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.