गणेशोत्सवाआधी वर्धेत पोलिसांचा रूट मार्च, कडेकोट बंदोबस्ताची तयारी
गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी वर्धा पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्ग आणि विसर्जन मार्गावरून रूट मार्च काढला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वर्धा जिल्हा पोलीस दलाने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण तयारी केली असून, १२ सप्टेंबर २०२६ रोजी वर्धा शहरातील प्रमुख मार्गांवर आणि गणपती विसर्जनासाठी ठरवलेल्या मार्गावर पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, हा यामागचा उद्देश आहे.
या रूट मार्चदरम्यान पोलिसांनी शहरातील प्रमुख बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, संवेदनशील भाग, महत्त्वाचे चौक तसेच विसर्जनासाठी निश्चित केलेल्या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि बंदोबस्ताची तयारी दाखवून दिली. गणेशोत्सव हा सर्व धर्मांच्या लोकांनी एकोप्याने, उत्साहाने आणि शांततेत साजरा करण्याचा सण असल्याचे सांगत, या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस दलाकडून विशेष उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. यामध्ये गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण, संवेदनशील ठिकाणी खास बंदोबस्त आणि समाजकंटकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे यांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी नागरिकांना आवाहन केले की, गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा सण आहे. वर्धा जिल्ह्यातील लोकांनी हा सण शांततेत, शिस्तीत आणि एकमेकांच्या भावनांचा आदर राखून साजरा करावा. गणेश मंडळांनी प्रशासन आणि पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, तसेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचेल असे कुठलेही कृत्य करू नये, असेही त्यांनी नमूद केले. अफवा, चुकीच्या बातम्या किंवा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मेसेज यांच्यावर विश्वास ठेवू नये आणि ते पुढे पाठवूही नयेत, असे आवाहन त्यांनी केले. कुठलीही संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा प्रकार दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, तसेच पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्धा पोलिसांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे, उत्सव आनंदाने साजरा करा, पण कायदा हातात घेऊ नका. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या, सार्वजनिक शांतता बिघडवणाऱ्या किंवा नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. सुरक्षित, शांततामय आणि शिस्तबद्ध वातावरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी सहकार्य करत उत्सव सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन वर्धा जिल्हा पोलिसांतर्फे करण्यात आले.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च आयोजित करण्यात आला. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील २१ पोलीस अधिकारी, २०० पोलीस अंमलदार, २०० होमगार्ड, दंगल नियंत्रणाची दोन पथके, एक जलद प्रतिसाद पथक (QRT) आणि एक SRPF प्लाटून सहभागी झाले होते.