कोकणात गणेशभक्तांसाठी 'वार्ता विघ्नांची'; रेल्वे आरक्षणात अडथळे, महामार्गाची कामेही अपूर्ण
गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस उरले असताना कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसमोरील अडचणी दरवर्षीप्रमाणे यंदाही कायम राहिल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत, आणि दुसरीकडे कोकण मार्गावरील प्रमुख रेल्वेगाड्यांचे तिकीट मिळणेही आता जवळपास अशक्य झाले आहे. रस्ते आणि रेल्वे या दोन्ही मार्गांवरील अडथळे दूर करण्यात यंत्रणांना अपयश आल्याने कोकणवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर हीच परिस्थिती उद्भवत असल्याने प्रवाशांमधील संताप वाढला आहे.
नागोठणे येथे नव्याने बांधलेल्या पुलाला तडे गेल्याने हा पूल सध्या वाहतुकीसाठी बंद आहे. पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून किमान एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र पुलाची संरचना आणि सक्षमता तपासल्यानंतरच वाहतूक सुरू करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. म्हणजे पुलाची चाचणी पूर्ण होण्यापर्यंत वाहतूक पूर्ववत होणार नाही, हे स्पष्ट आहे. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण मार्गाची किमान एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न होता, मात्र कोकण रेल्वेने तुळई टाकण्याच्या कामासाठी ब्लॉक देण्यास नकार दिल्याने हे काम आता वेळेत पूर्ण होणार नाही. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीच्या समस्येला प्रवाशांना सामोरे जावे लागणार आहे. यंत्रणांच्या दाव्यानुसार मुंबई-गोवा महामार्गाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असले, तरी महामार्गावरील पूल आणि बाह्यवळण मार्गांची कामे अजूनही अपूर्ण आहेत. चिपळूण येथील उड्डाणपुलाचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही.
रस्त्यांवरील अडचणी कायम असतानाच रेल्वेमार्गातही प्रवाशांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. १० सप्टेंबरपासून पुढील काही दिवसांसाठी कोकणात जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून प्रतीक्षा यादीही भरल्याने आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर आता 'रिग्रेट' म्हणजेच प्रतीक्षा यादीही बंद झाल्याचा संदेश दिसू लागला आहे. गणेशोत्सवासाठी ११ आणि १२ सप्टेंबर रोजी कोकणात जाण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या संख्येने आरक्षण केले होते, मात्र मागणीच्या तुलनेत रेल्वेगाड्यांची संख्या अपुरी पडल्याने अनेकांना तिकीट मिळू शकलेले नाही. प्रतीक्षा यादीची मर्यादा ओलांडल्याने रेल्वेने थेट तिकीट विक्रीच बंद केली असून, यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रेल्वे प्रशासनाने तात्काळ अतिरिक्त विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत. ज्या गाड्यांचे आरक्षण भरले आहे त्यामध्ये जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, सुरत-मडगाव एक्सप्रेस, मंगळुरू एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस यांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांमधील जागा भरल्यामुळे आणि प्रतीक्षा यादीही बंद झाल्यामुळे कोकणात जाण्यासाठी नवीन तिकीट काढणे सध्या शक्य नाही.