गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:36 IST

गणेशोत्सवापूर्वी चंद्रपुरात पोलिसांचा रूट मार्च, अधीक्षक आयुष नोपानी यांचे शांततेचे आवाहन

गांधी चौक ते केवलराम चौक दरम्यान पोलिसांचे संचलन, ३३ अधिकारी आणि २५५ अंमलदारांचा ताफा रस्त्यावर उतरला.

गणेशोत्सवापूर्वी चंद्रपुरात पोलिसांचा रूट मार्च, अधीक्षक आयुष नोपानी यांचे शांततेचे आवाहन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गणेशोत्सव तोंडावर आला असताना चंद्रपूर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस दलाने १२ सप्टेंबर २०२६ रोजी शहरात मोठा रूट मार्च काढला. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून उत्सवाच्या काळात रस्त्यावर मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक जमण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चंद्रपूर पोलीस दलाने आधीच पूर्ण तयारी केली असून, या रूट मार्चमधून पोलिसांनी आपली सज्जता शहरवासीयांसमोर दाखवून दिली.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हे संचलन झाले. पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथून सुरू झालेला हा मार्च गांधी चौक, जटपुरा गेट आणि दवा बाजार मार्गे रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विसर्जन मार्गावरून जात केवलराम चौक येथे संपला. शहराच्या मुख्य बाजारपेठेतून आणि वर्दळीच्या रस्त्यांवरून गेलेल्या या संचलनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.

या संचलनात चंद्रपूर उपविभागांतर्गत येणाऱ्या चंद्रपूर शहर, रामनगर आणि दुर्गापूर या पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा, दोष सिद्धी शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएस शाखा, एसआरपीएफ ग्रुप क्रमांक १७ चे जवान आणि गणेशोत्सव बंदोबस्तासाठी दाखल झालेले होमगार्डही उपस्थित होते. एकूण ३३ पोलीस अधिकारी, २५५ पोलीस अंमलदार, एक क्यूआरटी पथक आणि ९४ जवानांचा ताफा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरला होता.

लाठी आणि हेल्मेटसह सज्ज पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच दंगा नियंत्रण साहित्य, अश्रुधूर यंत्रणा, सीसीटीव्ही व्हॅन, दंगा नियंत्रण पथकाचे वाहन, पेट्रोलिंग वाहन, ट्रॅफिक वाहन, मार्शल वाहन आणि डायल ११२ ची वाहने या संचलनात पुढे होती. संचलनादरम्यान पोलिसांनी सोशल मीडियाचा गैरवापर टाळणे, जातीय सलोखा जपणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे याबाबत नागरिकांमध्ये प्रत्यक्ष जनजागृतीही केली.

या निमित्ताने पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती कोणीही पसरवू नये, दोन धर्म वा जातींमध्ये तेढ निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य करू नये आणि शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. वाहतुकीचे नियम पाळण्यासोबतच प्रशासनाने उत्सवासाठी जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले. डीजे, प्लाझ्मा आणि डोळ्यांना इजा पोहोचवणाऱ्या लेझर लाईट्सचा वापर पूर्णपणे टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, तसेच गणेश मंडळांनी मिरवणुकीदरम्यान सामाजिक जनजागृतीपर बॅनर व होर्डिंग्स लावून पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन नोपानी यांनी केले. "चंद्रपूर पोलीस सदैव तत्पर, आपले सोबत, आपले साठी" असा विश्वास प्रशासनाने यावेळी व्यक्त केला.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ