गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:37 IST

गणेशोत्सव मंडळांमधून शासकीय योजनांची माहिती देणार 'लोकसंवाद-२०२६' उपक्रम

माहिती व जनसंपर्क विभागाकडून १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या काळात राज्यभर गणेश मंडळांमध्ये जनजागृती कार्यक्रम

गणेशोत्सव मंडळांमधून शासकीय योजनांची माहिती देणार 'लोकसंवाद-२०२६' उपक्रम
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती थेट पोहोचावी, यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने 'लोकसंवाद-२०२६' हा विशेष जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा उपक्रम राज्यभर राबवला जाणार आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा मोठा उत्सव असल्यामुळे या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.

राज्य शासनाने गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' म्हणून आधीच घोषित केले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमणाऱ्या गणेश मंडळांच्या ठिकाणीच लोकसंवाद कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाच्या योजनांची माहिती देणे, नागरिकांशी थेट संवाद साधणे आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख आणि मानाच्या गणेशोत्सव मंडळांची यासाठी निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने विविध शासकीय विभागांच्या स्थानिक तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी नागरिकांना थेट बोलण्याची संधी मिळणार आहे.

'लोकसंवाद-२०२६'मध्ये कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, सहकार, पणन, सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण यासह जवळपास सर्वच शासकीय विभाग सहभागी होणार आहेत. शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, शेततळे आणि कृषी औजारांसाठीचे अनुदान अशा योजनांची माहिती दिली जाईल. त्याचबरोबर महिला बचत गट, महिलांसाठीच्या उच्च शिक्षण योजना, तसेच युवक आणि विद्यार्थ्यांसाठीच्या शिक्षण, कौशल्य विकास व शिष्यवृत्ती योजनांबाबतही नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.

आरोग्याच्या आघाडीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांसारख्या योजनांसह मोफत तपासणी, औषधोपचार आणि शिष्यवृत्तीशी संबंधित सुविधांची माहिती दिली जाणार आहे. कौशल्य विकासाच्या क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज योजना तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांच्या योजनांबाबत युवक आणि नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार आणि आपले सरकार या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे.

हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, सहकार, पणन, कौशल्य विकास, सामाजिक न्याय तसेच पोलीस विभागासह संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी स्थानिक क्षेत्रीय अधिकारी तसेच जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करतील, त्यामुळे शासनाच्या योजनांबाबत अधिकृत आणि थेट माहिती नागरिकांना मिळेल.

शक्य असेल तिथे या कार्यक्रमांचे फेसबुक किंवा युट्यूबवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. सोशल मीडियावर #गणेशोत्सव२०२६ आणि #लोकसंवाद२०२६ हे हॅशटॅग वापरले जातील, जेणेकरून प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंतही योजनांची माहिती पोहोचेल. या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेश मंडळांनी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, तर मुंबई शहर व उपनगरातील गणेश मंडळांनी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागाने केले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ