गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वारशाच्या जागतिक नोंदीसाठी नागरिकांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी पत्की
गोंदिया जिल्हा प्रशासनाकडून Bappa.org उपक्रमांतर्गत गणेशोत्सवाच्या परंपरांचे दस्तऐवजीकरण, नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती
राज्य शासनाने 14 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' असा दर्जा दिला आहे. महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या उत्सवाचे व्यापक दस्तऐवजीकरण करून तो जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी, तसेच युनेस्कोच्या वारसा दर्जासह इतर जागतिक मानांकने मिळवण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांना नागरिकांनी सक्रिय सहभागातून सहकार्य करावे, असे आवाहन गोंदिया जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.
सन 2026 च्या गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी घेण्यासाठी संबंधित कार्यालयांकडे अर्ज करणाऱ्या गणेश मंडळांना या शासन निर्णयाची माहिती दिली जाणार आहे, तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि प्रोत्साहनही दिले जाणार आहे.
यंदा सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या पुरातत्व संचालनालयामार्फत Bappa.org नावाचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये, विविध परंपरा, कला, लोकसंस्कृती आणि सांस्कृतिक वारसा यांची माहिती जमा करून ती जतन केली जाणार आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्रासह देशभरात आणि 35 हून अधिक जागतिक शहरांमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची परंपरा, गणेशमूर्ती स्थापना, सजावट, हस्तकला, रूढी-परंपरा, कला सादरीकरण, खाद्यसंस्कृती, आठवणी आणि छायाचित्रे अशी माहिती नागरिकांना WhatsAppच्या माध्यमातून नोंदवता आणि अपलोड करता येणार आहे. नागरिकांच्या सहभागातून जमा होणारी ही माहिती महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचे अधिकृत आणि कायमस्वरूपी सांस्कृतिक जतन तयार करण्यासाठी उपयोगी पडणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात सन 2026 च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. रुपेशकुमार राऊत यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9270241077 असा आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळे, नागरिक आणि संबंधित घटकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून गोंदिया जिल्ह्यातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जगासमोर आणावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Bappa.org या संकेतस्थळावरून आपल्या लाडक्या गणरायाशी संबंधित परंपरा, कला, संस्कृती, आठवणी आणि छायाचित्रांची माहिती नोंदवून या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी व्हावे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेच्या जागतिक दस्तऐवजीकरणात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव मंदार पत्की यांनी केले आहे.