गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन 'नमो एक्स्प्रेस' कोकणाकडे रवाना
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून १५०० हून अधिक चाकरमानी घेऊन 'नमो एक्स्प्रेस' कोकणाकडे रवाना झाली, तर ऑगस्ट क्रांती मैदानावरून पाच विशेष बसने सुमारे २०० भाविकांनी प्रवास केला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना आपल्या गावच्या बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाता यावे, यासाठी लोढा फाउंडेशनने दरवर्षीप्रमाणे यंदाही खास 'नमो एक्स्प्रेस'ची सोय केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक १८ वरून शनिवारी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी ही ट्रेन कोकणाकडे रवाना झाली. मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनमधून १५०० हून अधिक गणेशभक्त आपल्या गावी निघाले.
ही 'नमो एक्स्प्रेस' छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी या मार्गावर धावणार आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खास उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या कुटुंबासोबत आणि गावच्या बाप्पासोबत सण साजरा करता यावा, या हेतूने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता आणि हक्काची जागा मिळाल्यावर भाविकांचा उत्साह आणखी वाढला. ट्रेन रवाना होताच संपूर्ण स्टेशन परिसर 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने दुमदुमून गेला. बाप्पाच्या आगमनासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या आनंदाला त्या क्षणी अक्षरशः उधाण आले होते.
याबाबत बोलताना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, गणेशोत्सव हा प्रत्येक मराठी माणसाच्या भावविश्वाशी जोडलेला सण आहे. मुंबईत नोकरी-व्यवसायासाठी राहणाऱ्या चाकरमान्यांना आपल्या गावच्या बाप्पाचं दर्शन घेता यावं आणि कुटुंबासोबत सण साजरा करता यावा, हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे. गणेशोत्सव जवळ येताच प्रत्येक मुंबईकराला आपल्या गावाची आणि आपल्या माणसांची ओढ लागते, हीच भावनिक नाळ लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गणेशभक्तांसाठी अशी खास ट्रेन आणि बसची सोय केली जाते. मुंबईतून कोकणाकडे रवाना होताना भाविकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हीच या उपक्रमाची खरी पावती असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारी रात्री ११ वाजता भाजपतर्फे आणखी एक विशेष ट्रेन सोडण्यात आली आहे, त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या भाविकांना अतिरिक्त वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. याआधी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ऑगस्ट क्रांती मैदानावरून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पाच विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. दक्षिण मुंबईतील सुमारे २०० चाकरमान्यांनी या बसने प्रवास केला. 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात या बस कोकणाकडे रवाना झाल्या.