गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त, विसर्जनाला ३२ हजार कर्मचारी तैनात
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दलाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली असून दहा दिवसांच्या बंदोबस्तासाठी २५ हजारांहून अधिक तर विसर्जनाच्या दिवशी ३० ते ३२ हजार पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात राहणार आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गणेशोत्सव जवळ आल्याने मुंबई पोलिस दलाने आपली संपूर्ण यंत्रणा सज्ज केली असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण तयारीला लागले आहेत. उत्सव काळात कुठेही त्रुटी राहू नये यासाठी पोलिस यंत्रणा मनपा, वाहतूक पोलिस, सुरक्षा रक्षक दल आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दल यांच्याशी समन्वय साधत आहे. शिवाय प्रत्येक परिमंडळ पातळीवर त्या-त्या भागातील सार्वजनिक गणेश मंडळांशीही संपर्क ठेवला जात आहे.
दहा दिवस चालणाऱ्या या बंदोबस्तात २५ हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत, तर प्रत्यक्ष विसर्जनाच्या दिवशी हा आकडा ३० ते ३२ हजारांपर्यंत जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक गणपती दर्शन आणि आरास पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळते, आणि याच काळात पोलिसांची खरी परीक्षा लागते.
कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवताना धार्मिक तेढ निर्माण होऊ न देणे, दंगली रोखणे यासोबतच दहशतवादी आणि देशविघातक शक्तींवर करडी नजर ठेवण्याचे कामही पोलिसांना करावे लागते. यासाठी कायदा-सुव्यवस्था प्रशासन, दहशतवादविरोधी पथक आणि गुन्हे अन्वेषण विभाग यांना सतत सतर्क राहावे लागते. वाहतूक पोलिसांवर तर वाहतूक सुरळीत ठेवण्याची मोठी जबाबदारी असते. उत्सव सुरू झाल्यापासून विसर्जन होईपर्यंत या सर्व यंत्रणांना २४ तास ड्युटीवर राहावे लागणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने १३ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट आणि पॅराग्लायडर यांसारख्या उपकरणांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विसर्जनाच्या दिवशी ३० ते ३२ हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह तटरक्षक दल, राज्य राखीव पोलिस दलाच्या १६ प्लाटून तुकड्या आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या पाच तुकड्या तैनात असणार आहेत. यासोबतच दंगलरोधी वाहने आणि महिला पोलिसांचे विशेष पथकही सज्ज ठेवण्यात येणार आहे. मात्र ही प्राथमिक आकडेवारी असून गरजेनुसार यात बदल केला जाऊ शकतो, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
यंदा मुंबई शहरात सुमारे साडेसहा हजार लहान-मोठी सार्वजनिक गणेश मंडळे असणार असून जवळपास पावणेदोन लाख घरगुती गणपती बसणार आहेत. यापूर्वी भुलेश्वर आणि कुर्ल्यातील शीतल तलाव परिसरात उंच मूर्तींच्या आगमन मिरवणुकीत अपघात घडले होते, जे खराब रस्त्यांमुळे झाल्याचे सांगितले जाते. सुदैवाने त्यावेळी शांतता राखत परिस्थिती हाताळण्यात आली, मात्र अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उंच मूर्ती असलेल्या मंडळांशी आणि मनपाशी समन्वय साधण्यात आला आहे. शहरात आधीच सीसीटीव्हींचे मोठे जाळे असले तरी संवेदनशील आणि संशयास्पद ठिकाणी अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे बसवण्यात आल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी नमूद केले.