विसर्जन घाटांवरील कामे १३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा; ठाणे महापौरांचा आदेश
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने विसर्जन घाटांवरील तयारीचा वेग वाढवला असून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी विविध घाटांची पाहणी करून प्रशासनाला ठोस सूचना दिल्या आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सोमवारी श्रीगणेशाचे आगमन होणार असल्याने ठाणे महानगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनाच्या तयारीला वेग दिला आहे. विसर्जनाच्या वेळी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि घाटांवर सर्व सोयी-सुविधा वेळेत उभ्या राहाव्यात, यासाठी सुरू असलेल्या कामांची पाहणी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी स्वतः घाटांवर जाऊन केली. विसर्जन घाटांवरील सर्व कामे रविवार १३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असा स्पष्ट आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिला.
महापौरांच्या या पाहणी दौऱ्यावेळी वागळे प्रभाग समिती सभापती एकता भोईर, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती सभापती सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेवक संजय वाले, विकास रेपाळे आणि प्रशांत सोनग्रा उपस्थित होते. यासोबतच उपनगर अभियंता मोहन कलाल, कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारीही सोबत होते.
मंगळवारी महापौरांनी मासुंदा तलावाकडील दत्त घाट, रायलादेवी येथील कृत्रिम तलाव तसेच गायमुख येथील विसर्जन घाटांना भेट दिली. याआधी शुक्रवारी त्यांनी कोपरी, कोलशेत आणि पारसिक येथील विसर्जन घाटांचीही पाहणी केली होती. या फेरीत कोपरी प्रभाग समिती सभापती मीनल संखे, कळवा प्रभाग समिती सभापती विजया लासे, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती सभापती सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेवक अनिता गौरी, संजय भोईर आणि उषा भोईर यांची उपस्थिती होती. घाटांवर सुरू असलेली कामे, भाविकांसाठीच्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि स्वच्छता याबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
दीड दिवसांच्या गणेशमूर्तींपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत वेगवेगळ्या दिवशी विसर्जन होत असल्याने घाटांवर सातत्याने भाविकांची गर्दी होते. हे लक्षात घेत महापौरांनी घाटांच्या परिसरात आवश्यक सुविधा तातडीने उभारण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेच्या तलावांना बॅरिकेडिंग करणे, विसर्जन घाटावर आरतीसाठी वेगळी व्यवस्था करणे, पावसाचा अंदाज लक्षात घेऊन वेदरशेड उभारणे आणि भाविकांसाठी मोबाईल टॉयलेटची सोय करणे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
विसर्जन घाटांव्यतिरिक्त ठाणे महानगरपालिकेने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गणेशमूर्ती स्वीकार केंद्रेही उभारली आहेत. भाविकांनी या केंद्रांचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी घाटांवर मोठी गर्दी होत असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या विसर्जन मिरवणुका शक्य तितक्या लवकर काढाव्यात, असेही महापौरांनी सांगितले. विसर्जनाची प्रक्रिया वेळेत आणि सुरळीत व्हावी यासाठी महापालिका, पोलीस आणि वाहतूक विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे मंडळांनी तसेच भाविकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.