शालेय सुविधांसाठी निधीची उणीव भासणार नाही, शिक्षणमंत्री दादाजी भुसेंची ग्वाही
गडचिरोलीत 'चला शाळेत जाऊया' अभियानांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विविध शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षकांचा सत्कार केला.
शाळेत नुसतं पुस्तकी शिक्षण पुरत नाही, तर पुढच्या पिढीत राष्ट्रभक्ती आणि चांगले संस्कार रुजवणंही तितकंच गरजेचं आहे, असं मत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी गडचिरोलीत मांडलं. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात शिक्षक कठीण परिस्थितीतही मनापासून काम करत असल्याचं नमूद करत, शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
१० सप्टेंबर रोजी शिक्षणमंत्री भुसे यांनी 'चला शाळेत जाऊया' या अभियानांतर्गत जिल्ह्यातील अनेक शाळांना प्रत्यक्ष भेट देत तिथली शैक्षणिक गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयींची पाहणी केली. त्यानंतर सामाजिक न्याय भवन सभागृहात गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी संजय आसवले, शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रेरक उजगारे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
गावात मंदिर उभारणीसाठी जसं संपूर्ण गाव एकत्र येतं, तसंच शाळेला ज्ञानमंदिर मानून तिच्या विकासासाठी माजी विद्यार्थी, पालक आणि गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन भुसे यांनी केलं. शिक्षकांच्या मेहनतीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचं चित्र आता बदलतंय, आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या घडणीतले महत्त्वाचे घटक असून त्यांची भूमिका फक्त शिकवण्यापुरती मर्यादित नसते, असंही त्यांनी सांगितलं.
शाळांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहं, पुरेशा वर्गखोल्या, क्रीडांगण, ई-लॅब आणि वाचनालय यासारख्या सुविधा दर्जेदार असाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा नियोजन समिती, सीएसआर निधी आणि मानव विकास मिशन यांच्या माध्यमातून शाळांसाठी निधी उभा करण्याचे प्रयत्न केले जातील, असं ते म्हणाले. मोडकळीस आलेल्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक ठरणाऱ्या जुन्या शाळा इमारतींचं तातडीनं निर्लेखन करून नव्या इमारतींचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात पारदर्शक पद्धतीनं शिक्षक भरती सुरू असून लवकरच रिक्त जागांवर शिक्षक रुजू होतील, त्यामुळे शिक्षकांची कमतरता दूर होईल असं भुसे यांनी सांगितलं. अनेक वर्षं प्रलंबित असलेला केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा प्रश्नही मार्गी लागल्याचं त्यांनी नमूद केलं. मुलींच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक सैनिकी प्रशिक्षणावर भर दिला जातोय, असंही ते म्हणाले.
या अभियानांतर्गत भुसे यांनी रामनगर येथील पीएम श्री जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, आरमोरी रोडवरील प्लॅटिनम ज्युबली हायस्कूल, श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूल गोगाव, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोगाव आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आयएसओ आदर्श शाळा बोदली यांना भेटी दिल्या. या भेटींमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट गप्पा मारत शाळेत काय शिकवलं जातं, शिक्षक कसे शिकवतात, कोणत्या सुविधा आहेत आणि विद्यार्थ्यांना आणखी काय हवं याची माहिती घेतली.
रामनगरच्या पीएम श्री शाळेत विद्यार्थ्यांचं वाचन आणि कविता ऐकून त्यांनी कौतुक केलं आणि वर्गखोल्यांची कमतरता दूर करण्याच्या सूचना दिल्या. गोगावच्या जिल्हा परिषद शाळेत त्यांनी झाड लावलं, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांचा आढावा घेतला आणि स्वच्छतागृहांसह इतर सुविधा पाहिल्या. बोदली येथील आयएसओ आदर्श शाळेत विद्यार्थ्यांसोबत पोळा सण साजरा करत त्यांनी संवाद साधला, मुलींकडून राखी बांधून घेतली, डिजिटल वर्ग आणि संगणक लॅब पाहून नादुरुस्त पॅनेल्स लवकर दुरुस्त करण्याचे निर्देश दिले, आणि शाळा व्यवस्थापनाच्या वॉल कंपाउंड, शेड तसेच पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबतच्या मागण्यांवर सकारात्मक पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं.
सामाजिक न्याय भवनातील कार्यक्रमात राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि उपक्रमशील शिक्षकांचा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बंगळुरूच्या इस्रोला शैक्षणिक भेट देणाऱ्या मोहुर्ली मॉडेल स्कूलच्या सन्ना शकील पठाण हिनं आपला अनुभव आणि पहिल्या विमानप्रवासाची आठवण सांगितली. आदर्श इंग्लिश हायस्कूल देसाईगंजच्या ध्रुव विनोद कोवे याचा नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी इन्स्पायर अवॉर्डअंतर्गत विशेष सत्कार झाला. राज्य विज्ञान मेळाव्यात दुसरं पारितोषिक मिळवणाऱ्या इंदिरा गांधी विद्यालय, येनापूरच्या नमन पेदापल्लीवार याचाही गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू आभा संग्रामे, खो-खो खेळाडू ध्रुव हलामी, राष्ट्रीय कबड्डीपटू श्रवण उसेंडी, कराटेपटू सार्थक गेडाम, वनिता पुंगाटी, तसेच सलोनी करपे, वंशिका झंझाळ, कृष्णा नेरकर, रोशन काटवे आणि रमेश बन्सी या विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला. एनएमएमएस परीक्षेत यश मिळवणाऱ्या वैष्णवी राऊत, स्वीटी उसेंडी, कृतिका गुरुनुले, प्रांजल भोयर यांच्यासह नवोदय आणि विविध शिष्यवृत्ती परीक्षांत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच पूर्वा विनोद मडावी आणि श्वेता वासुदेव गेडाम यांचाही सत्कार करण्यात आला. प्रयोगशील शिक्षक दिलीप नाकाडे आणि मंगरमेंढा शाळेचे प्रवीण दोर्लीकर यांच्यासह जिल्ह्यातील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षकांना शाल आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं.