FASTag बँक आता सहज बदलता येणार; गडकरींकडून 'OneTag' सुविधा सुरू
Global Fintech Fest 2026 मध्ये नितीन गडकरी यांनी 'OneTag' सुविधा लॉन्च केली, त्यामुळे FASTag शी जोडलेली बँक बदलण्यासाठी जुना टॅग काढून नवीन घेण्याची गरज उरणार नाही.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
FASTag वापरणाऱ्या वाहनधारकांसाठी एक मोठी सोय आता उपलब्ध झाली आहे. बँक बदलायची असेल तर आतापर्यंत गाडीवरचा जुना FASTag काढून नवीन बँकेकडून वेगळा टॅग घ्यावा लागत होता. आता ही कटकट संपणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी Global Fintech Fest (GFF) 2026 या कार्यक्रमात 'OneTag' नावाची नवी सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे वाहनधारकांना त्यांचा सध्याचा NETC FASTag जसाच्या तसा ठेवून फक्त त्यामागची बँक बदलता येणार आहे.
Indian Highways Management Company Limited (IHMCL) आणि National Payments Corporation of India (NPCI) या दोन संस्थांनी एकत्र येऊन OneTag ही सुविधा तयार केली आहे. FASTag ग्राहकांना बँक बदलताना जो त्रास सहन करावा लागत होता, तो कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. आधीच्या पद्धतीत जुना टॅग बंद करणे, नवीन बँकेकडे अर्ज करणे, कागदपत्रे जमा करणे आणि नवीन टॅग गाडीवर बसवणे अशा अनेक टप्प्यांतून जावं लागत असे. यात वेळही जायचा आणि पैसेही खर्च व्हायचे.
ही नवी सुविधा सध्या NHAI च्या 'Rajmarg Yatra' या मोबाइल अॅपवरून वापरता येणार आहे. या अॅपच्या मदतीने ग्राहकाला बँक पोर्ट करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येईल. यामध्ये आधी ग्राहक या सुविधेसाठी पात्र आहे की नाही, हे तपासले जाईल. त्यानंतर सुरक्षित पद्धतीने त्याची ओळख पडताळली जाईल. ग्राहकाची परवानगी घेतल्यावर त्याला हवी असलेली नवीन बँक निवडण्याचा पर्याय मिळेल. ही सगळी प्रक्रिया झाल्यावर निवडलेली नवीन बँक ग्राहकाचे ऑनबोर्डिंग करेल.
या सुविधेतील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे टॅगचा Tag ID आणि गाडीचा नोंदणी क्रमांक तसाच राहणार आहे. त्यामुळे गाडीवर आधीपासून चिकटवलेला FASTag काढायची किंवा नवीन टॅग पुन्हा लावायची गरज पडणार नाही. नवीन टॅग मागवणे, त्याची डिलिव्हरी घेणे आणि तो गाडीवर बसवणे या सगळ्या कटकटीतून ग्राहकांची सुटका होईल.
बँक बदलण्याच्या या प्रक्रियेत जुनी आणि नवी बँक यांच्या जबाबदाऱ्याही ठरवण्यात आल्या आहेत. वॉलेटशी संबंधित प्रकरणे, ओळख पडताळणी, वॉलेटमधली शिल्लक रक्कम, रिफंड आणि प्रलंबित व्यवहार यांची जबाबदारी जुन्या बँकेकडे राहील. दुसरीकडे, पोर्टेबिलिटीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नवीन बँक ग्राहकाचे ऑनबोर्डिंग करून त्याला FASTag शी संबंधित आवश्यक सेवा पुरवेल.
OneTag मुळे ग्राहकांना आपल्या पसंतीची बँक निवडण्याचे मोठे स्वातंत्र्य मिळणार आहे. नवीन टॅग घ्यावा लागणार नसल्याने वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील. तसेच नवीन टॅगची छपाई, डिलिव्हरी आणि पुन्हा जारी करण्यावर होणारा खर्चही कमी होण्याची शक्यता आहे. सध्याचा FASTag कायम ठेवून बँक बदलण्याची ही सोय देशभरातील लाखो वाहनधारकांसाठी उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा आहे.