गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:59 IST

एसटी स्थानकांवर स्तनदा मातांसाठी १२५ हिरकणी कक्ष, टोयोटा किर्लोस्करच्या सीएसआर निधीतून उभारणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात सामंजस्य करार, तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने उभारणी

एसटी स्थानकांवर स्तनदा मातांसाठी १२५ हिरकणी कक्ष, टोयोटा किर्लोस्करच्या सीएसआर निधीतून उभारणी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

राज्यातील एसटी बसस्थानकांवर प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांना आता बाळाला दूध पाजण्यासाठी खासगी आणि सुरक्षित जागा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला असून, राज्यभरातील बसस्थानकांवर एकूण १२५ 'हिरकणी कक्ष' उभारले जाणार आहेत.

हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.

प्रवासादरम्यान बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि खासगी जागा नसल्याने स्तनदा मातांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी हे कक्ष उभारले जाणार असून, एसटीच्या बसस्थानकांवर मातृत्वाला आवश्यक असणारी संवेदनशीलता आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

या संपूर्ण प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच सीएसआर उपक्रमांतर्गत सहकार्य करणार आहे. करारानुसार बसस्थानकांवर अंदाजे ३ मीटर बाय ३ मीटर आकाराचे प्री-फॅब्रिकेटेड कक्ष उभारले जातील. यामध्ये स्तनपानासह बाळाची निगा राखण्यासाठी लागणारे फर्निचर, फिक्स्चर, अंतर्गत वायरिंग, विद्युतीकरण आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य यांचाही समावेश असेल.

करारातील नियोजनानुसार हे काम तीन आर्थिक वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे. २०२६-२७ या वर्षात ५० कक्ष, २०२७-२८ मध्ये आणखी ५० कक्ष, तर २०२८-२९ मध्ये उरलेले २५ कक्ष उभारले जातील. मात्र सीएसआर धोरण, उपलब्ध जागा आणि स्थानिक गरज यानुसार या संख्येत बदल होऊ शकतो, अशी तरतूद करारात करण्यात आली आहे.

प्रकल्पासाठी एसटी महामंडळाची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. महामंडळाला प्रत्येक ठिकाणी सुमारे ५ मीटर बाय ५ मीटर जागा उपलब्ध करून द्यावी लागेल, तसेच वीज, पाणी आणि स्थापनेसाठी सहकार्य करावे लागेल आणि आवश्यक त्या शासकीय परवानग्या मिळवाव्या लागतील. प्रकल्प पूर्ण होऊन साहित्य व सुविधा महामंडळाकडे हस्तांतरित झाल्यानंतर या कक्षांचे संचालन, सुरक्षा, दुरुस्ती, देखभाल आणि देखरेख करण्याची संपूर्ण जबाबदारी एसटीचीच राहणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी एसटीकडून कोणतेही आर्थिक योगदान दिले जाणार नसून, संपूर्ण खर्च टोयोटा किर्लोस्करच्या सीएसआर निधीतूनच केला जाणार आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यावर बोलताना सांगितले की, 'हिरकणी कक्ष' हा केवळ एक सुविधा प्रकल्प नसून मातृत्वाचा सन्मान, महिलांच्या गरजांची जाणीव आणि प्रवासी-केंद्रित एसटी व्यवस्थेच्या दिशेने टाकलेले संवेदनशील पाऊल ठरणार आहे.

ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या बसस्थानकांवर ही सुविधा सुरू झाल्याने महिला प्रवाशांच्या सन्मानात आणि प्रवासाच्या अनुभवात भर पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ