गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:41 IST

चंद्रपूर जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा मोहीम, CEO पुलकित सिंह यांचे आवाहन

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा मोहीम, CEO पुलकित सिंह यांचे आवाहन
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात होत आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्हाभर ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी नागरिकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

मोहिमेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली जाणार असून शाळांमध्ये विविध उपक्रम घेतले जातील आणि सफाई मित्रांचा सन्मानही केला जाणार आहे. ही चळवळ यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

'स्वच्छता ही सेवा (SHS)-२०२६' या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वच्छता, लोकसहभाग आणि पर्यावरण संवर्धनाला व्यापक चालना दिली जाणार आहे. जिल्ह्यातील नागरिक, ग्रामपंचायती, शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, बचतगट, विद्यार्थी, युवक तसेच विविध सामाजिक संस्थांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा आणि स्वच्छतेचा जागर निर्माण करावा, असे पुलकित सिंह यांनी सांगितले. यावर्षीच्या अभियानाची संकल्पना "स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत" अशी आहे. स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, या भावनेतून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

मोहिमेदरम्यान स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या CTUs (Cleanliness Target Units) आणि सार्वजनिक ठिकाणांमध्ये परिवर्तन घडवण्यावर भर दिला जाणार आहे. अशी ठिकाणे शोधून त्यांचे सुशोभीकरण व स्वच्छता केली जाईल. शाळा, महाविद्यालये, युवक व तरुणांमध्ये जनजागृतीसाठी 'स्वच्छता ज्ञान यात्रा', घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी, स्वच्छता व जलसंधारणाबाबत संवाद आणि जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातील.

सफाई मित्र, स्वच्छताग्रही आणि स्वच्छता कामगारांसाठी एकदिवसीय शिबिरे घेतली जाणार असून त्यांना विविध कल्याणकारी योजनांशी जोडले जाईल. यात प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, वैयक्तिक सुरक्षा साधनांचे (PPE Kits) वितरण आणि सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सफाई मित्रांच्या योगदानाचा सन्मान करण्यावरही विशेष भर दिला जाईल.

घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ तसेच कचरा वर्गीकरण व संकलनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय स्थानिक व प्रादेशिक क्रीडा स्पर्धा, स्वच्छता पर्व, हरित पर्व, वृक्षारोपण उपक्रम, 'एक पेड़ माँ के नाम' अभियान, जागतिक पर्यटन दिनानिमित्त विशेष उपक्रम आणि २ ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभा व बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. "कचऱ्यातून उपयुक्त निर्मिती - कचऱ्यापासून संपत्ती" (Waste to Wealth) आणि "कचऱ्यापासून कलानिर्मिती" (Waste to Art) या उपक्रमांतून कचऱ्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रणाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच Reuse, Reduce, Recycle (RRR) उपक्रम आणि Bulk Waste Generators यांच्या माध्यमातूनही कचरा व्यवस्थापनाला चालना दिली जाईल.

पुलकित सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या, शासकीय विभाग, शाळा-महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, बचतगट, युवक मंडळे, नागरिक समाज संस्था, कॉर्पोरेट संस्था तसेच नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले. "स्वच्छता ही सेवा अभियान हे केवळ काही दिवसांचे अभियान न राहता स्वच्छतेची कायमस्वरूपी लोकचळवळ बनली पाहिजे. प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे. स्वच्छ गाव, स्वच्छ परिसर आणि स्वच्छ जिल्ह्याच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे," असे पुलकित सिंह आणि जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मच्छिंद्रनाथ धस यांनी सांगितले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ