गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:41 IST

चंद्रपुरात नेहरू शाळेच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट, आपच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे तीन दिवसांत चौकशीचे

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील इंदिरानगरमधील पंडित जवाहरलाल नेहरू शाळेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

चंद्रपुरात नेहरू शाळेच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट, आपच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे तीन दिवसांत चौकशीचे
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील इंदिरानगर येथे उभारल्या जात असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू शाळेच्या नव्या इमारतीच्या बांधकामावरून वाद निर्माण झाला आहे. या बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

निवेदनाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) तीन दिवसांच्या आत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित काम तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यासह इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले आहे.

शाळेच्या या नव्या इमारतीचे बांधकाम अंदाजे ३ कोटी ५४ लाख रुपयांच्या निधीतून सुरू आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या भागातील गरीब आणि कष्टकरी पालक आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्याची आशा बाळगून त्यांना याच शाळेत पाठवणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी आणि सुरक्षिततेशी संबंधित या विषयात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी ठाम भूमिका पक्षाने मांडली आहे.

प्रशासनाला दिलेल्या निवेदनात आपने शाळेचे सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवून स्वतंत्र आणि सक्षम तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. याशिवाय इमारतीचे कॉलम, बीम, स्लॅब, पायाभरणी आणि आरसीसी कामांची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, तसेच बांधकामात वापरले जाणारे सिमेंट, रेती, गिट्टी आणि काँक्रीटचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासावेत, असा आग्रह पक्षाने धरला आहे.

मंजूर अंदाजपत्रक, बीओक्यू आणि नकाशानुसार प्रत्यक्ष काम झाले आहे का याची पडताळणी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अभियंत्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कामाची कोणतीही बिले अदा न करता हा अहवाल नागरिकांसमोर सार्वजनिक करावा, असेही पक्षाने म्हटले आहे.

केवळ सरकारी निधी खर्च करणे पुरेसे नसून त्यातून सुरक्षित आणि दर्जेदार इमारत उभी राहणे गरजेचे आहे. उद्या एखादी दुर्घटना घडल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा आजच गुणवत्ता तपासणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे, असे आपचे संघटन मंत्री संतोष बोपचे यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाचे आश्वासन केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष काम थांबवून तपासणी सुरू झाली पाहिजे, अन्यथा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालक आणि नागरिकांना सोबत घेऊन तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. निवेदन सादर करताना आपचे प्रदेश सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे आणि संघटन मंत्री संतोष बोपचे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ