दुर्गापुरात परवानगीविना डीजे १२३ डेसिबलवर वाजवल्याने पोलिसांची साडेतेरा लाखांची जप्ती
चंद्रपुरातील उर्जानगर नेरी भागात गणेशोत्सव मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्यावर दुर्गापूर पोलिसांनी कारवाई करत वाहनासह साडेतेरा लाखांचे साहित्य जप्त केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलिसांनी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत नियम मोडून कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या एका चालकावर कडक कारवाई केली आहे. कोंडी वॉर्ड क्रमांक ६, उर्जानगर नेरी येथे विनापरवाना आणि ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवून सार्वजनिक शांतता बिघडवल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरून महिंद्रा सुप्रो गाडीसह तब्बल १३ लाख ५० हजार रुपयांचे ध्वनिक्षेपक साहित्य जप्त करण्यात आले. अमन गंगाधर गोहणे (रा. बाबराळा, ता. मूल, जि. चंद्रपूर) असे या डीजे चालकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे ७ वाजता दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पथक भागात गस्त घालत असताना, गणेशोत्सव आगमन मिरवणुकीत उर्जानगर नेरी येथे डीजे खूप मोठ्या आवाजात वाजत असल्याची माहिती त्यांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेगावकर तातडीने त्या ठिकाणी पोहोचले आणि साऊंड लेव्हल मीटरने आवाजाची तपासणी केली. या पहिल्या तपासणीत आवाजाची पातळी १०५.५ डेसिबल इतकी नोंदवली गेली. त्यावर पोलिसांनी पंचांसमोर चालकाला नियमांचे पालन करण्याची तंबी दिली आणि स्टेशन डायरीत त्याची नोंद केली. मात्र चालकाने ही सूचना धुडकावून पुन्हा काही वेळातच तितक्याच किंवा त्याहून जास्त आवाजात डीजे सुरू केला.
नागरिकांना या आवाजाचा प्रचंड त्रास होत असल्याचे लक्षात येताच पोलीस अंमलदार भोयर आणि पोलीस शिपाई हरीश तलांडे हे पंच आणि ध्वनीमापक यंत्र घेऊन पुन्हा घटनास्थळी दाखल झाले. या दुसऱ्या तपासणीत आवाजाची पातळी तब्बल १२३.०५ डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे समोर आले, जी माणसाच्या कानांसाठी अत्यंत हानिकारक आणि ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त होती. चालकाकडे डीजे वाजवण्याची अधिकृत परवानगी आहे का, अशी विचारणा पोलिसांनी केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे उघड झाले. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे थेट उल्लंघन झाल्याचे लक्षात घेत पोलिसांनी दोन पंचांसमोर जप्तीची कारवाई सुरू केली.
या कारवाईत पोलिसांनी १ लाख रुपये किमतीचे शार्प ऑडिओ कंपनीचे मॉडेल नंबर एमटी-१२०१ अँप्लिफायर, साडेचार लाख रुपये किमतीचे दोन स्पीकर व एक टॉप, १ लाख रुपये किमतीचा डायनाटेक कंपनीचा डीजे मिक्सर, १ लाख रुपये किमतीचे १५ केव्ही जनरेटर आणि दोन पार्क लाईट, तसेच ६ लाख रुपये किमतीचे महिंद्रा सुप्रो वाहन (क्रमांक एमएच ३४ सी.क्यू. ३४९४) असे मिळून एकूण १३ लाख ५० हजार रुपयांचे साहित्य जप्त करून पोलीस स्टेशनला जमा केले. आरोपी अमन गोहणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ सहकलम १३६ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेगावकर, पोलीस उपनिरीक्षक पंकज वासाडे, पोलीस हवालदार भोयर आणि पोलीस शिपाई तलांडे यांनी ही कारवाई केली. आगामी सण-उत्सवांच्या काळात परवानगीविना डीजे वाजवून किंवा आवाजाची मर्यादा ओलांडून सार्वजनिक शांतता बिघडवणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.