गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:19 IST

चंद्रपुरात दहीहंडी महोत्सवात नियम पाळून डीजे वाजवल्याने खासदार धानोरकर यांच्याकडून आयोजकांचे कौतुक

चंद्रपुरातील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर झालेल्या भव्य दहीहंडी महोत्सवात बाबुपेठच्या शीतल माता गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा दहीहंडी फोडत १,५१,००० रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले.

चंद्रपुरात दहीहंडी महोत्सवात नियम पाळून डीजे वाजवल्याने खासदार धानोरकर यांच्याकडून आयोजकांचे कौतुक
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपुरातील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर 'द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट' आणि 'बाळूभाऊ मित्र परिवार' यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या भव्य दहीहंडी महोत्सवाला शहरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी करत उदंड प्रतिसाद दिला. या महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या दहीहंडी स्पर्धेत बाबुपेठच्या 'शीतल माता गोविंदा पथका'ने उत्तुंग मानवी मनोरे रचत हंडी फोडली आणि १,५१,००० रुपयांचे प्रथम पारितोषिक स्वतःच्या नावावर केले. विशेष बाब म्हणजे या पथकाने सलग दुसऱ्या वर्षीही हीच हंडी फोडून नवा विक्रम नोंदवला.

या सोहळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर खास उपस्थित होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांनुसार आणि प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे डीजे वाजवण्यात आला, याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. पुढे बोलताना त्यांनी असे आवाहन केले की, यापुढे येणाऱ्या सर्व सण-उत्सवांतही नागरिकांनी आणि मंडळांनी अशाच पद्धतीने प्रशासकीय नियमांचे पालन करून डीजे वाजवावा.

कार्यक्रमाला राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, वरोरा नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, मूल नगराध्यक्षा एकता समर्थ, बल्लारपूर नगराध्यक्षा अल्का वाढई, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदा जेणेकर, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा राव आणि चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते सुरेंद्र अडबाले उपस्थित होते. यासोबतच महानगरपालिका व सर्व नगर परिषदांचे नगरसेवक, विविध लोकप्रतिनिधी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने हजर होते.

महोत्सवाची सुरुवात दुपारी १८ वर्षांवरील महिलांच्या रस्सीखेच स्पर्धेने झाली. या चुरशीच्या स्पर्धेत 'टग ऑफ वॉर' संघाने १०,००० रुपये आणि चषक पटकावत प्रथम क्रमांक मिळवला, तर 'इरई' संघाला ७,००० रुपयांसह द्वितीय आणि 'आझाद गोल्डन' संघाला ५,००० रुपयांसह तृतीय क्रमांकाचा चषक मिळाला. यानंतर ५ ते १० वयोगटातील मुलांसाठी 'भारतातील थोर महापुरुष' या संकल्पनेवर आधारित वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांचा वेश परिधान केलेल्या चिमुकल्यांमधून शिफा पवार हिने ५,००० रुपये व चषकासह प्रथम क्रमांक पटकावला. संजीवन पवार याने ३,००० रुपये व चषकासह द्वितीय तर अहिल्या लालसरे हिने २,००० रुपये व चषकासह तृतीय क्रमांक मिळवला.

संध्याकाळी सर्वांसाठी खुल्या असलेल्या 'भाऊंची दहीहंडी' स्पर्धेने महोत्सवाला रंगत आणली. गोविंदा पथकांनी रचलेल्या उत्तुंग मनोऱ्यांमुळे आणि 'गोविंदा आला रे'च्या घोषणांनी न्यू इंग्लिश शाळेचे मैदान दणाणून गेले होते. याच स्पर्धेत बाबुपेठच्या शीतल माता गोविंदा पथकाने बाजी मारली. विजेत्या सर्व खेळाडूंचा आणि गोविंदा पथकांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक देऊन गौरव करण्यात आला.

हा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी 'द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट' आणि 'बाळूभाऊ मित्र परिवार'च्या सदस्यांनी तसेच स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित नागरिक व सहभागी स्पर्धकांचे आभार अतुल वाघमारे यांनी मानले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ