गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:40 IST

चंद्रपूर: बाबुपेठच्या शीतल माता पथकाची दहीहंडी सलग दुसऱ्या वर्षी अव्वल, १,५१,००० रुपयांचे बक्षीस

न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर झालेल्या भव्य दहीहंडी महोत्सवात बाबुपेठच्या शीतल माता गोविंदा पथकाने उत्तुंग मानवी मनोरे रचत हंडी फोडली आणि सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला.

चंद्रपूर: बाबुपेठच्या शीतल माता पथकाची दहीहंडी सलग दुसऱ्या वर्षी अव्वल, १,५१,००० रुपयांचे बक्षीस छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपुरातील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात दहीहंडी महोत्सव पार पडला. 'द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट' आणि 'बाळूभाऊ मित्र परिवार' यांनी संयुक्तपणे या उत्सवाचे आयोजन केले होते.

सर्वांसाठी खुल्या असलेल्या 'भाऊंची दहीहंडी' या मुख्य स्पर्धेत बाबुपेठच्या शीतल माता गोविंदा पथकाने बाजी मारली. गोविंदा पथकांनी उत्तुंग मानवी मनोरे रचत मैदान 'गोविंदा आला रे'च्या गजराने दुमदुमून टाकले. अखेर शीतल माता गोविंदा पथकाने थरारक मनोरे रचून हंडी फोडली आणि १,५१,००० रुपये रोख व भव्य चषक असे प्रथम पारितोषिक पटकावले. विशेष म्हणजे या पथकाने सलग दुसऱ्या वर्षी हीच हंडी फोडून नवा विक्रम प्रस्थापित केला.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती दर्शवत विजेत्या पथकाचे कौतुक केले. जिल्हा पोलीस अधीक्षक व न्यायालयाच्या नियमांनुसार आणि दिलेल्या सूचनेनुसारच या उत्सवात डीजे वाजवण्यात आला, याबद्दल त्यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. यापुढे येणाऱ्या सर्व सण-उत्सवांमध्येही नागरिकांनी व मंडळांनी याच पद्धतीने प्रशासनाच्या नियमांचे पालन करून डीजे वाजवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या सोहळ्याला राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, वरोरा नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, मूल नगराध्यक्षा एकता समर्थ, बल्लारपूर नगराध्यक्षा अल्का वाढई, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदा जेणेकर, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा राव आणि चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे काँग्रेस गटनेते सुरेंद्र अडबाले यांच्यासह महानगरपालिका व विविध नगर परिषदांचे नगरसेवक, इतर लोकप्रतिनिधी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महोत्सवाची सुरुवात दुपारी १८ वर्षांवरील महिलांच्या रस्सीखेच स्पर्धेने झाली. यात 'टग ऑफ वॉर' संघाने १०,००० रुपये व चषक असे प्रथम पारितोषिक जिंकले, तर 'इरई' संघाला ७,००० रुपये व चषकासह द्वितीय आणि 'आझाद गोल्डन' संघाला ५,००० रुपये व चषकासह तृतीय क्रमांक मिळाला. त्यानंतर ५ ते १० वयोगटातील मुलांसाठी 'भारतातील थोर महापुरुष' या विषयावरील वेशभूषा स्पर्धा झाली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या वेशात सजलेल्या चिमुकल्यांमध्ये शिफा पवार हिने ५,००० रुपये व चषकासह प्रथम, संजीवन पवार याने ३,००० रुपये व चषकासह द्वितीय तर अहिल्या लालसरे हिने २,००० रुपये व चषकासह तृतीय क्रमांक पटकावला.

विजेत्या सर्व खेळाडूंचा व गोविंदा पथकांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक देऊन सत्कार करण्यात आला. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी 'द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट' व 'बाळूभाऊ मित्र परिवार'च्या सर्व सदस्यांनी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थितांचे व स्पर्धकांचे आभार अतुल वाघमारे यांनी मानले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ