चंद्रपुरातील ४०० वर्षे जुन्या शिवलिंगावर भव्य मंदिराचे छत्र, अमृता फडणवीस यांची उपस्थिती
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने आणि स्वखर्चातून उभारलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मंगळवारी पार पडला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपुरातील राज्यातील सर्वात मोठ्या पुरातन महाशिवलिंगाला आता भव्य मंदिराचे छत्र मिळाले आहे. या शिवलिंगाच्या जीर्णोद्धारानिमित्त मंगळवारी धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याला अमृता देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेऊन आणि स्वतःच्या खर्चातून हे मंदिर उभारले. यामुळे तब्बल ४०० हून अधिक वर्षे उघड्यावर असलेल्या महादेवाला आता कायमस्वरूपी छत मिळाले.
सोहळ्याला जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, वेकोलीचे व्यवस्थापक संजीवसिंग रेड्डी, मंदिर समितीचे अध्यक्ष शंकर बल्लेपवार, सचिव किशोर रायपूरकर, चंद्रपूर महानगर जिल्हा प्रभारी अर्चना डेहनकर, महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गिर्हे, मनपा गटनेता चंद्रशेखर शेट्टी, नगराध्यक्ष नीलेश ताजने, जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्यासह पदाधिकारी आणि नगरसेवक-नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे पुरातन महाशिवलिंग चंद्रपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानले जाते. मात्र अनेक वर्षे ऊन, वारा आणि पावसाचा मारा सोसत हे शिवलिंग उघड्यावरच होते. याचे महत्त्व लक्षात घेऊन आमदार जोरगेवार यांनी मागील श्रावणात मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प सोडला होता आणि याच श्रावणात तो पूर्ण करत मंदिराबरोबरच संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यात आला.
हिमाचल प्रदेश आणि नेपाळच्या पारंपरिक स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेल्या या मंदिराला वैशिष्ट्यपूर्ण रूप देण्यात आले असून श्रद्धा, स्थापत्य आणि पर्यटनाचा संगम येथे पाहायला मिळतो. अमृता फडणवीस कावड घेऊन मंदिर परिसरात दाखल झाल्या. त्यांच्या उपस्थितीत शिवलिंग पूजन, मंत्रोच्चारात महाअभिषेक, महाआरती आणि महाकाल शृंगार दर्शन असे कार्यक्रम झाले. आमदार जोरगेवार यांच्या विनंतीवरून अमृता फडणवीस यांनी 'शिवतांडव स्तोत्र' सादर केले, त्यामुळे उपस्थित भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला.
आमदार जोरगेवार म्हणाले की, जवळपास ४०० वर्षे जुने हे शिवलिंग वर्षानुवर्षे उघड्यावर होते, ही परिस्थिती योग्य नव्हती. मागील वर्षी अमृता फडणवीस चंद्रपुरात आल्या तेव्हा हे शिवलिंग पाहून त्यांनी भव्य मंदिर उभारण्याची गरज व्यक्त केली होती आणि तेच शब्द संकल्पाचे कारण ठरले. हा प्रकल्प केवळ दगड-विटांचा नसून श्रद्धेची उभारणी, इतिहासाचा सन्मान आणि पुढील पिढीसाठीचा वारसा असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरला धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा आपला संकल्प असल्याचेही ते म्हणाले. देशाच्या मध्यभागी असलेल्या चंद्रपुरात भाविकांनी बारा ज्योतिर्लिंगांऐवजी याच शिवलिंगाचे दर्शन घ्यावे, या उद्देशाने हा विकास करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मंदिर उभारताना अनेक अडथळे आले, अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, तरीही काम थांबले नाही, कारण हे काम चंद्रपूरच्या श्रद्धेसाठी आणि भविष्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात धर्म आणि माणूस सुरक्षित राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, मागील वर्षीही त्या येथे आल्या होत्या आणि यंदाही येण्याचा योग आला. मंदिराचे काम थांबवण्याचे प्रयत्न झाले, मात्र शक्तीपेक्षा श्रद्धा मोठी असल्याने हे मंदिर उभे राहिले. शिवतांडव म्हणजे बदल आणि परिवर्तन असून अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाज एकत्र येतो, श्रद्धा आणि सातत्याने काम केले तर विषाचेही अमृत होते, असेही त्या म्हणाल्या.
लालपेठ-भिवापूर येथील या पुरातन महाशिवलिंगाला या सोहळ्यामुळे धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने नवे महत्त्व मिळाले आहे. दुर्लक्षित राहिलेले हे शिवस्थान आता भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत असून भविष्यात जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावरील प्रमुख धार्मिक केंद्र बनेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या वेळी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि येथे उभारल्या जाणाऱ्या दोन कोटी रुपयांच्या इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले.