बुलढाणा: पीएम किसान योजनेसाठी केवायसी करण्याची ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत, कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधार संलग्नीकरण व ई-केवायसी लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी काही अनिवार्य अटी अजूनही पूर्ण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आधार संलग्नीकरण आणि ई-केवायसीची पूर्तता त्वरित करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने आर्थिक मदत दिली जाते. हा लाभ फक्त पात्र आणि प्रमाणित लाभार्थ्यांनाच मिळावा, यासाठी केंद्र शासनाने भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत करणे, बँक खात्याशी आधार संलग्नीकरण आणि ई-केवायसी या बाबी अनिवार्य केल्या आहेत. या अटी पूर्ण करून घेण्यासाठी मागील दोन वर्षांत देशव्यापी मोहीम, जनजागृती कार्यक्रम आणि सामाईक सुविधा केंद्रांमार्फत वेळोवेळी आवाहन करण्यात आले होते. तरीही जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांची लँड सीडिंग, आधार सीडिंग किंवा ई-केवायसी यापैकी एक किंवा अधिक कामे अद्याप बाकी आहेत. अशा शेतकऱ्यांनी सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान ही कामे पूर्ण करून घ्यावीत, असे सांगण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार, या विशेष मोहिमेच्या काळातही ज्या लाभार्थ्यांनी अनिवार्य अटी पूर्ण केल्या नाहीत, त्यांना ठरलेल्या प्रक्रियेनुसार नव्याने अर्ज करून पडताळणी प्रक्रिया पुन्हा पूर्ण करावी लागू शकते. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३१ ऑक्टोबरच्या आत बाकी असलेल्या सर्व अनिवार्य बाबींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन कृषी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
योजनेचा लाभ खऱ्या आणि हयात असलेल्या लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचावा यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. जिल्ह्यातील २ हजार २८ लाभार्थ्यांचे ई-केवायसी अजून बाकी आहे. याशिवाय, २०२६-२७ या वर्षासाठीचे वार्षिक ई-केवायसी बाकी असलेल्या २ लाख ६३ हजार ८०७ लाभार्थ्यांनीही ते पूर्ण करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या सामाईक सुविधा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरण करावे किंवा पीएम-किसान मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही प्रक्रिया करावी.
जिल्ह्यातील सुमारे ४ हजार १०१ लाभार्थ्यांची बँक खाती अजूनही आधारशी जोडलेली नाहीत. अशा शेतकऱ्यांनी ज्या बँकेत त्यांचे खाते आहे, त्या बँकेच्या शाखेत जाऊन खाते आधार क्रमांकाशी संलग्न करून घ्यावे. याशिवाय इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत आधार जोडलेले बँक खाते उघडण्याचीही सोय आहे. काही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी संबंधित बँक, सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.