'त्या' अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश
नांदेड जिल्ह्यातील भोकर-बारड राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे निर्देश दिले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातून जाणाऱ्या भोकर-बारड राष्ट्रीय महामार्गावरील सीताखंडी घाटात गुरुवारी (दि. १०) सायंकाळी एक ट्रक आणि पिकअप वाहन समोरासमोर धडकले. या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही दुर्दैवी घटना कळताच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून संपूर्ण माहिती घेतली. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती शासकीय मदत तातडीने द्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर जखमींना योग्य उपचार आणि वैद्यकीय सुविधा वेळेत मिळतील याची दक्षता घेण्याच्याही सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पालकमंत्री सावे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. "या दुःखद घटनेत जीवितहानी झाल्याने मनस्वी दुःख झाले. या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो," असे ते म्हणाले.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी २ लाख रुपयांची सानुग्रह मदत मिळावी यासाठी कार्यवाही केली जाणार आहे. या मदतीची रक्कम मृतांच्या कुटुंबीयांना थेट पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमार्फत दिली जाते. तर या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, जेणेकरून जखमींच्या उपचारांचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी होईल.
या घटनेची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत, अपघातग्रस्त कुटुंबीयांना आवश्यक ती शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
दरम्यान, याच वेळी गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील नागरा परिसरातही एक ट्रक आणि बोलेरो प्रवासी वाहनाची समोरासमोर भीषण धडक झाली. या स्वतंत्र अपघातात बोलेरोमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृत आणि जखमी प्रवाशांपैकी बहुतांश जण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.