श्रावणानंतर भीमाशंकरला स्वच्छतेची झळाळी, नदीच्या उगमस्थळावरही सफाई मोहीम
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिर परिसरात आणि भीमा नदीच्या उगमस्थळी सुमीत फॅसिलिटीजने राबवलेल्या विशेष स्वच्छता सप्ताहात कचरा, प्लास्टिक आणि निर्माल्याची मोठ्या प्रमाणात सफाई करण्यात आली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
श्रावण महिना संपताना भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर पुन्हा एकदा चकाचक झाला आहे. सुमीत फॅसिलिटीजने या ठिकाणी २ ते ११ सप्टेंबर २०२६ या काळात खास स्वच्छता सप्ताह राबवला. या मोहिमेत केवळ मंदिर परिसराचीच नव्हे तर भीमा नदीच्या पवित्र उगमस्थळाचीही स्वच्छता करण्यावर भर देण्यात आला.
श्रावणात भीमाशंकरला भाविकांची प्रचंड गर्दी होते आणि त्यामुळे मंदिर परिसरात कचरा, प्लास्टिक तसेच निर्माल्य मोठ्या प्रमाणात साचते. ही बाब लक्षात घेऊन सुमीत फॅसिलिटीजने स्वतःहून पुढाकार घेत सफाई मोहीम हाती घेतली. भीमा नदीच्या उगमस्थळी साचलेला गाळ, प्लास्टिक कचरा आणि भाविकांनी अर्पण केलेले निर्माल्य काढून टाकण्यात आले. मंदिर परिसरातून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाचीही स्वच्छता करण्यात आली.
या कामासाठी २५ ते ३० सफाई कर्मचारी आणि तीन पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना काम करण्यासाठी स्वतंत्र देखरेख वाहन, कचरापेट्या, झाडू, कचऱ्याच्या पिशव्या आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी PPE किट्स पुरवण्यात आले. या पथकाने कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यासोबतच मंदिराकडे जाणारे रस्ते, आजूबाजूचा परिसर आणि नाल्यांचीही सफाई केली.
श्रावणातील भाविकांच्या गर्दीमुळे परिसरात रोज मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होत होता. सुमीत फॅसिलिटीजच्या पथकाने दररोज ३० ते ३५ कचरापेट्यांमधील कचरा, प्लास्टिक आणि निर्माल्य गोळा केले आणि त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली.
याआधी मुंबईतील जुहू आणि वरळी समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या सुमीत फॅसिलिटीजने आता भीमाशंकर तीर्थक्षेत्रातही असाच उपक्रम हाती घेतला आहे. धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेबरोबरच नैसर्गिक वारशाच्या जपणुकीबाबत जनजागृती करणे हा या मोहिमेमागचा उद्देश असल्याचे कंपनीने सांगितले.
सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे कार्यकारी अध्यक्ष सुमित साळुंके यांनी सांगितले की, भीमाशंकर हे केवळ आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे तीर्थक्षेत्र नाही, तर याच ठिकाणापासून भीमा नदीचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे या पवित्र स्थळासह नदीच्या उगमाची काळजी घेणे हीच खरी सेवा असल्याची भावना समूहाची आहे, असे ते म्हणाले. ही स्वच्छता मोहीम फक्त कचरा हटवण्यापुरती मर्यादित नसून श्रद्धा, पर्यावरण आणि समाजाप्रती असलेल्या सामूहिक जबाबदारीचा भाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसच्या माहितीनुसार, देशातील २० हून अधिक राज्यांमध्ये या समूहाचे कार्यक्षेत्र पसरलेले असून ५० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. फॅसिलिटीज मॅनेजमेंट, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा सेवा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा अशा विविध क्षेत्रांत समूह सेवा पुरवत असल्याचेही सांगण्यात आले.