बांबू क्षेत्राच्या विकासासाठी संशोधन व तंत्रज्ञानाची जोड आवश्यक : रामानुजम
चंद्रपुरात जागतिक बांबू सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांचे प्रतिपादन
बांबूवर आधारित उद्योगांना पुढील काळात मोठी संधी असून, या क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वन विभाग, संशोधन संस्था, उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्र, शेतकरी आणि स्थानिक समुदाय यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे आहे, असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी सांगितले. बांबू विकासाकडे केवळ लागवड आणि उत्पादन एवढ्यापुरते न पाहता, शाश्वत उपजीविका, स्थानिक रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणारे साधन म्हणून पाहायला हवे, असेही ते म्हणाले.
'बांबू फॉर द फ्युचर फ्रॉम ट्रॅडिशन टू इनोव्हेशन' या संकल्पनेखाली आयोजित 'जागतिक बांबू सप्ताह-२०२६'च्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून रामानुजम बोलत होते. दि. १४ ते १८ सप्टेंबर या काळात चालणाऱ्या या सप्ताहाचा उद्देश बांबूला केवळ पारंपरिक वापरापुरते मर्यादित न ठेवता विज्ञान, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास, मूल्यवर्धन आणि नवोपक्रमाशी जोडणे हा आहे. दुसऱ्या दिवशी झालेल्या विविध सत्रांमध्ये वन विभागातील वरिष्ठ अधिकारी, वैज्ञानिक, संशोधक, प्राध्यापक, उद्योजक आणि बांबू क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्लीचे संचालक तथा चंद्रपूर वन प्रबोधिनीचे अपर संचालक (प्रशिक्षण) उमेश वर्मा, निरी नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लाल सिंग, न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन्स प्रा. लि., भद्रावतीचे वरिष्ठ व्यवस्थापक (स्ट्रॅटेजी) आयुष राज सिन्हा, एसएमएमसीए नागपूरच्या आर्किटेक्चर विभागाच्या प्राध्यापक डॉ. तारिका दगडकर, चंद्रपूर वन प्रबोधिनीचे उपसंचालक विश्वनाथ चव्हाण, हनुमंत जाधव, अश्विनी जाधव, सत्र संचालक संभाजी गवळी व रामदास पुजारी, बीआरटीसीचे वन परिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे, तसेच ज्ञान प्रबोधिनी इनोव्हेशन फाउंडेशन, पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव मोगरेकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात उमेश वर्मा यांनी जागतिक बांबू सप्ताह आयोजित करण्यामागची भूमिका मांडत बीआरटीसीमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आयुष राज सिन्हा यांनी शाश्वत बांबू विकास, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भविष्यातील संधींवर भाष्य केले. संशोधनातून तयार होणारे तंत्रज्ञान प्रत्यक्ष उद्योग आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी दुवा तयार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. लाल सिंग यांनी बांबूच्या माध्यमातून पर्यावरण पुनर्स्थापना आणि परिसंस्था संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. पर्यावरणीय आणि आर्थिक गरजांचा ताळमेळ घालण्यासाठी बांबूचा अधिक प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. ज्ञान प्रबोधिनी इनोव्हेशन फाउंडेशनचे सीईओ वैभव मोगरेकर यांनी 'मूल्यवर्धनातून बांबूला नवी दिशा' या विषयावर मार्गदर्शन केले.
याखेरीज संजीवनी ॲग्रो मशिनरी, नागपूरचे अनिल चौक, बिलासपूरच्या डॉ. गुंजन पाटील, नागालँडचे डॉ. भूपेश गिरीधरण आणि तेलंगणाचे श्रवण कुमार चिवुकुला यांनी ऑनलाइन पद्धतीने बांबू क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीआरटीसीच्या पर्यवेक्षिका योगिता साठवणे आणि विभागप्रमुख सुमेध लिचडे यांनी केले, तर निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला डॉ. आंबेडकर महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, सुशिलाबाई मामीदवार सोशल वर्क कॉलेज, जनता महाविद्यालय, एफईएस गर्ल्स कॉलेज आणि राजीव गांधी कॉलेजमधील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्रे देण्यात आली.