गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:37 IST

बल्लारपूरात २ ते १७ ऑक्टोबर अग्निवीर भरती रॅली, प्रशासनाची जय्यत तयारी

महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांतील उमेदवार बल्लारपूरच्या तालुका क्रीडा संकुलात दाखल होणार असून प्रशासनाने वाहतूक, आरोग्य आणि सुरक्षेची तयारी सुरू केली आहे.

बल्लारपूरात २ ते १७ ऑक्टोबर अग्निवीर भरती रॅली, प्रशासनाची जय्यत तयारी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात २ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत अग्निवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीसाठी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांतील उमेदवार बल्लारपूरमध्ये येणार आहेत. मोठ्या संख्येने उमेदवार दाखल होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांना लागणाऱ्या सुविधा वेळेत उभ्या राहाव्यात, यासाठी सर्व विभागांनी एकत्र येऊन सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिल्या आहेत.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी भरतीच्या तयारीबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत डॉ. व्यवहारे यांनी संबंधित विभागांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आणि नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, पोलिस आणि राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलाची संयुक्त पाहणी करून आवश्यक कामांचे नियोजन करावे, असे सांगण्यात आले. दुरुस्ती आणि विद्युतीकरणाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पूर्ण करावीत, असेही निर्देश देण्यात आले.

स्टेडियमबाहेरील जागेत उमेदवारांसाठी पैसे देऊन घेता येतील असे खाद्यपदार्थ आणि आवश्यक वस्तूंचे स्टॉल उभारण्याची जबाबदारी उमेद आणि माविमच्या बचत गटांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच उमेदवारांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिस विभागाने पुरेसे मनुष्यबळ तैनात करावे, अशी सूचना देण्यात आली.

क्रीडा संकुल परिसरातील गवत आणि झुडपे काढून स्वच्छता ठेवावी, पुरेशी स्वच्छतागृहे उभारावीत, उमेदवारांच्या ने-आणीसाठी बसेसची व्यवस्था करावी आणि भरतीच्या संपूर्ण कालावधीत वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा आणि तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

भरतीदरम्यान उमेदवारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिका, प्रथमोपचार साहित्य आणि डॉक्टरांचे पथक तयार ठेवण्यात येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी सुरळीत व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून किमान दहा शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच क्रीडा संकुल परिसरात साप किंवा इतर वन्यप्राण्यांमुळे उमेदवारांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी वनविभागाचे आवश्यक मनुष्यबळ तैनात ठेवण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी दिले आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ