आळंदीत इंद्रायणी नदीत मृत मासे आढळले, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
रसायनमिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याचा आरोप, अखिल भारत हिंदू महासभेने प्रशासनाला निवेदन देत कारवाईचा इशारा दिला
तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या संख्येने मासे मृतावस्थेत आढळून आले असून, यामुळे नदीच्या वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आळंदी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा केंद्रापासून उत्तर-दक्षिण दिशेने नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना मृत माशांचा खच पसरलेला दिसून आला. हे दृश्य पाहून वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आळंदीतील साठवण बंधारा ते चिंबळी बंधारा या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात मृत मासे सापडले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या हद्दीतून सांडपाणी तसेच रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महानगरपालिका आणि पीएमआरडीए या दोन्ही यंत्रणांच्या हद्दीतून येणारे हे पाणी नदीत मिसळल्यामुळे यामुळे नदीतील जलचरांचे अस्तित्वच धोक्यात आले असून, दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र विकासाची प्रक्रिया सुरू असतानाच पवित्र मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याची आणि रसायनमिश्रित पाण्याची तातडीने तपासणी करून त्यासाठी जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून आणि संघटनांकडून सातत्याने होत आहे.
अखिल भारत हिंदू महासभेने इंद्रायणी नदीचे प्रदूषण तातडीने रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची आणि प्रदूषणास जबाबदार घटकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, पुणे प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि पीएमआरडीए आयुक्त अशा एकूण पाच वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष वैभवराज रौंदळ आणि पुणे जिल्हा धार्मिक प्रकोष्ठ अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी हे निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले.
पुंडलिक मंदिरापासून डुडुळगाव पुलापर्यंतच्या नदी परिसराची पाहणी केली असता अनेक ठिकाणी मृत मासे आढळल्याचा दावा महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या पाहणीदरम्यान संपूर्ण नदीपात्रातच मृत माशांचे प्रमाण मोठे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरवर्षी इंद्रायणी नदीत अशा प्रकारे मासे मृत होण्याच्या घटना घडत असून, नदीत येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळेच हा प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा वारकरी, भाविक आणि नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अखिल भारत हिंदू महासभेने दिला आहे.