बनावट आयडींना आळा घालण्यासाठी IRCTCची मोठी मोहीम, ९ कोटींहून अधिक खात्यांवर कारवाई
रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराला लगाम घालण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई केली असून, कोट्यवधी संशयास्पद खाती कायमची किंवा तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ऑनलाइन रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराला आणि त्यामागे सक्रिय असलेल्या दलालांना रोखण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई हाती घेतली आहे. बनावट युझर आयडी तयार करून प्रणालीचा गैरवापर करणाऱ्या एजंट आणि दलालांची तब्बल ३ कोटी ४ लाख खाती कायमस्वरूपी निष्क्रय करण्यात आली आहेत. या शिवाय संशयास्पद हालचालींमध्ये सहभागी असल्याचे आढळलेली आणखी ६.३३ कोटी खाती तात्पुरती निलंबित करण्यात आली आहेत. या खातेधारकांची ओळख पुन्हा पडताळून झाल्याशिवाय त्यांना तिकीट बुकिंग करता येणार नाही.
आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, अनेक एजंट बनावट ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक वापरून नवनवीन युझर आयडी बनवत होते आणि तिकीट विक्री सुरू होताच सकाळी मोठ्या प्रमाणात आगाऊ बुकिंग करत होते. अशा प्रकारे मिळवलेली तिकिटे नंतर सणासुदीच्या दिवसांत आणि सुट्टीच्या हंगामात गरजू प्रवाशांना चढ्या दराने विकली जात होती. हा प्रकार रोखण्यासाठी कंपनीने बुकिंग प्रक्रियेतच बदल केले आहेत.
आता आगाऊ आरक्षण विंडो सकाळी ८ वाजता उघडल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत, म्हणजे सकाळी ८ ते ८.१० या वेळेत अधिकृत एजंटना तिकीट बुक करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. तसेच याच आगाऊ बुकिंग विंडोदरम्यान तिकीट काढण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचे शासकीय ओळखपत्र बायोमेट्रिक पद्धतीने किंवा अन्य प्रकारे सत्यापित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बॉट्स आणि फसव्या सॉफ्टवेअरच्या मदतीने होणाऱ्या बुकिंगलाही आयआरसीटीसीने लक्ष्य केले आहे. आधुनिक अँटी-बॉट यंत्रणा आणि कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे बॉट ट्रॅफिकमध्ये ५५ ते ६५ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे कंपनीने सांगितले आहे.
या कडक उपाययोजनांनंतरही तिकीट बुकिंगचे प्रमाण घटलेले नाही, उलट यंदा सणासुदीच्या काळात विक्रम मोडले गेले आहेत. ७ सप्टेंबर रोजी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून एका दिवसात विक्रमी २० लाखांहून अधिक तिकिटे बुक झाली, जो यंदाच्या वर्षातील एका दिवसातील सर्वाधिक बुकिंगचा आकडा ठरला. यापूर्वी १९ ऑगस्ट २०२५ रोजी एका दिवसात १८.४० लाख तिकिटे बुक झाली होती, तो आधीचा उच्चांक या नव्या आकड्याने मागे टाकला.
बनावट खाती आणि संशयास्पद बुकिंगला आळा घालण्यासाठी आयआरसीटीसीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासूनच स्वतंत्र मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत १६ हजार ४१ संशयास्पद ईमेल डोमेन ब्लॉक करण्यात आले असून, सायबर क्राईम पोर्टलवर ४.२१ लाख संशयास्पद पीएनआरशी संबंधित ५९२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.