टोयोटाच्या लँड क्रूझर 300 मध्ये हायब्रिड इंजिन, 457 PS पॉवर, जपानमध्ये 1 ऑक्टोबरपासून विक्री
टोयोटाने लँड क्रूझर 300 मध्ये हायब्रिड पॉवरट्रेन आणली असून जुने पेट्रोल V6 इंजिन बंद करण्यात आले आहे.
टोयोटाने आपल्या लोकप्रिय लँड क्रूझर 300 या SUV मध्ये मोठा बदल करत जपानमध्ये हायब्रिड पॉवरट्रेन सादर केली आहे. या नव्या मॉडेलमध्ये 3.5 लिटरचे ट्विन-टर्बो V6 पेट्रोल इंजिन इलेक्ट्रिक मोटरसोबत जोडण्यात आले आहे. या हायब्रिड सेटअपमधून एकूण 457 PS पॉवर आणि 790 Nm टॉर्क मिळतो, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
या अपडेटनंतर आधीचे पेट्रोल V6 मॉडेल पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. आता ग्राहकांसाठी दोनच ऑप्शन उरले आहेत, एक म्हणजे 3.3 लिटरचे ट्विन-टर्बो डिझेल इंजिन आणि दुसरे नवीन हायब्रिड व्हर्जन. जपानमध्ये या SUV ची विक्री 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
सीटिंग लेआउटच्या बाबतीत हायब्रिड आणि डिझेल व्हेरिएंटमध्ये फरक ठेवण्यात आला आहे. लँड क्रूझर 300 हायब्रिडला 7 सीटर केबिन देण्यात आले असून डिझेल व्हेरिएंट मात्र 5 सीटर लेआउटमध्ये उपलब्ध आहे. हायब्रिड मॉडेलमध्ये 6.5 Ah क्षमतेची निकेल-मेटल हायड्राइड बॅटरी कार्गो एरियाच्या खाली बसवण्यात आली आहे, तर इलेक्ट्रिक मोटर 10 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे हायब्रिड सिस्टममध्ये मोठा बिघाड झाला तरी V6 इंजिनच्या मदतीने ही SUV पुढे जाऊ शकते, अशी सुविधा देण्यात आली आहे.
फीचर्सच्या बाबतीतही नव्या लँड क्रूझरमध्ये अनेक अपडेट करण्यात आले आहेत. यात वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग, रोड-टू-व्हेइकल कम्युनिकेशन आणि कोल्ड वेदर पॅकेज हे आता स्टँडर्ड फीचर म्हणून देण्यात आले आहेत. यासोबतच ZX आणि GR Sport या व्हेरिएंटमध्ये ड्युअल 12.3 इंच स्क्रीन, कलर हेड-अप डिस्प्ले, 14 स्पीकरचे JBL ऑडिओ सिस्टम, कूल बॉक्स, रिअर सीट एंटरटेनमेंट आणि फ्रंट-रिअर डॅशकॅम अशा सुविधा मिळतात.
ऑफ-रोड क्षमतेच्या बाबतीत हायब्रिड मॉडेलने आपली 700 mm वॉटर-वेडिंग क्षमता कायम ठेवली आहे. मात्र या व्हेरिएंटचे वजन आधीच्या पेट्रोल V6 मॉडेलपेक्षा 170 किलोने जास्त झाले आहे. तसेच फ्युल टँकची क्षमताही 80 लिटरवरून कमी करून 68 लिटर करण्यात आली आहे. दुसरीकडे, 3.3 लिटरचे ट्विन-टर्बो डिझेल इंजिन 303 hp पॉवर आणि 700 Nm टॉर्क देते.
याशिवाय टोयोटाने ZX HEV या व्हेरिएंटच्या बाहेरील डिझाइनमध्येही काही बदल केले आहेत. यात नवीन बंपर एक्स्टेंशन, अपडेटेड फॉग-लॅम्प गार्निश आणि साइड इनटेक्स यांचा समावेश आहे. यासोबतच नवीन Modellista पॅकेजमध्ये फ्रंट-रिअर बंपर एक्स्टेंशन, फ्लेअर्ड फेंडर्स, साइड स्टेप्स, रूफ स्पॉयलर आणि 20 इंचाचे फोर्ज्ड अल्युमिनियम व्हील्स देण्यात आले आहेत.