पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचा साखरपुड्यानंतर सहा महिन्यांत ब्रेकअप
आकृती अग्रवालने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत पृथ्वी शॉपासून वेगळे झाल्याची माहिती दिली.
भारतीय क्रिकेट संघातून सध्या बाहेर असलेला सलामीवीर पृथ्वी शॉ प्रोफेशनल आणि वैयक्तिक अशा दोन्ही आयुष्यांत अडचणींना तोंड देतोय. आता तो पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय. त्याची होणारी बायको आकृती अग्रवालने साखरपुड्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत त्याच्यापासून वेगळं झाल्याची बातमी दिलीये. या दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या, पण आता पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचं नातं संपल्यावर शिक्कामोर्तब झालंय. आकृतीने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत शॉपासून वेगळं झाल्याची माहिती दिली आणि हा निर्णय दोघांच्या संमतीने घेतल्याचं तिने स्पष्ट केलं.
आकृतीने इन्स्टाग्रामवर लिहिलं की, अत्यंत जड मनाने ती आज हे सांगतेय की, तिने आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. भविष्यासाठीची ध्येयं आणि सध्याची परिस्थिती वेगळी असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं. दोघेही एकमेकांवर कितीही प्रेम करत असले आणि एकमेकांची कितीही काळजी घेत असले, तरी त्यांच्या वाटा वेगळ्या आहेत आणि हे त्यांनी स्वीकारलंय. आपापल्या जबाबदाऱ्या आणि सध्याची परिस्थिती बघता, त्यांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं तिने नमूद केलं.
पुढे आकृतीने लिहिलं की, दोघांसाठीही तिची प्रार्थना आहे की, भविष्यात दोघांनाही चांगल्या गोष्टी, शांतता आणि आनंद मिळावा. या कठीण काळात सगळ्यांनी त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी विनंतीही तिने केली. तसंच या निर्णयामागच्या कारणांबाबत कुणीही तर्कवितर्क लावू नयेत किंवा गैरसमज करून घेऊ नयेत, असंही तिने सांगितलं. आपली परिस्थिती समजून घेतल्याबद्दल आणि प्रायव्हसीचा आदर केल्याबद्दल तिने सगळ्यांचे मनापासून आभार मानले.
बऱ्याच काळाच्या नात्यानंतर क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचा या वर्षी ८ मार्चला साखरपुडा झाला होता. त्यावेळी दोघेही खूप आनंदात होते आणि त्यांनी चाहत्यांसोबत सुंदर फोटो शेअर केले होते. चाहते पृथ्वी शॉच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते, पण साखरपुड्यापासून लग्नापर्यंतचा हा प्रवास कधीच पूर्ण झाला नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात कटुता आल्याच्या बातम्या येत होत्या आणि १७ सप्टेंबरला त्यांनी आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला.
२६ वर्षांच्या पृथ्वी शॉला एकेकाळी भारतीय क्रिकेटचा पुढचा स्टार मानलं जात होतं. २०१८ मध्ये अवघ्या १८ व्या वर्षी शॉने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं आणि त्यात शतकही झळकावलं होतं. पण नंतर त्याचा फॉर्म घसरला आणि त्याला संघातून वगळण्यात आलं. सध्या तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्येही आपल्या जागेसाठी झगडतोय.