बंदुकीचा धाक दाखवून पंचपावलीत लूट, दोघांना अटक
नागपुरातील पंचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंदुकीसारखी दिसणारी एअर गन दाखवून एका तरुणाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन तरुणांनी आधी तक्रारदाराला शिवीगाळ करून मारहाण केली आणि नंतर जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या खिशातील रोकड हिसकावून घेतली, असा आरोप आहे. या प्रकरणी पंचपावली पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पंकज कुकडे हा मेहंदीबाग पॉवर हाऊस चौकाजवळील जयस्वाल देशी दारूच्या दुकानासमोर गेला होता. तो तिथे असतानाच सोमेश मर्सकोल्हे आणि सागर येटी या दोघांनी विनाकारण त्याच्याशी शिवीगाळ सुरू केली, असा आरोप आहे. या दोघांनी त्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असंही पोलिसांचं म्हणणं आहे.
शिवीगाळ आणि मारहाणीनंतर पंकज तिथून निघून आपल्या घराकडे जाऊ लागला. मात्र तो घराकडे निघाला असतानाच हे दोघे आरोपी पुन्हा एकदा त्याच्याजवळ पोहोचले. यावेळी सोमेश मर्सकोल्हे याने बंदुकीसारखी दिसणारी एअर गन काढून त्याला घाबरवलं आणि पुन्हा मारहाण केली, असा आरोप आहे. याचवेळी दुसरा आरोपी सागर येटी याने तक्रारदाराच्या शर्टाच्या खिशातून जबरदस्तीने रोकड काढून घेतली, असं पोलिसांचं म्हणणं आहे. ही घटना घडल्यानंतर दोन्ही आरोपी बाईकवरून घटनास्थळावरून फरार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पंचपावली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासणीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि अखेर दोघांनाही ताब्यात घेतलं.
चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी या घटनेत सहभागी असल्याची कबुली दिली, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी आरोपी सोमेशकडून लुटलेली रोकड, एअर गन आणि घटनेत वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
तपासादरम्यान दोन्ही आरोपींचा जुना गुन्हेगारी रेकॉर्डही समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पंचपावली आणि यशोधरा नगर या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरोधात खून, मारहाण आणि लूट यांसह जवळपास डझनभर गुन्हे आधीपासूनच दाखल आहेत, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
सध्या पंचपावली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.